नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि. २३) एकूण १,५६५ नवीन रुग्ण दाखल झाले असून, १७० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शुक्रवारी (दि. २२) नाशिक मनपा क्षेत्रात एक आणि ग्रामीण भागात एक याप्रमाणे दोन मृत्यू झाले असून, त्यामुळे बळींची संख्या २,०३९ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार ६२४ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ११ हजार ३२३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,२६२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.१२ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.६८, नाशिक ग्रामीण ९६.४६, मालेगाव शहरात ९३.५२, तर जिल्हाबाह्य ९४.२४ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ८४ हजार ५७६ असून, त्यातील ३ लाख ६५ हजार २०० रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १४ हजार ६२४ रुग्ण बाधित आढळून आले असून, ४७५२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.