नंदुरबार : प्रवासाचे प्रमुख साधन असलेल्या रेल्वे आणि स्थानकांवर दरदिवशी अनेकविध किस्सेही समोर येतात. यातील एक म्हणजे घर सोडून पळून आलेल्या अल्पवयीन बालकांचे, कोवळ्या वयात झालेली दिशाभूल अनेकांना रेल्वे मार्गाने स्थानकांवर आणून टाकत असल्याचे सतत समोर आले आहे. अशा बालकांचे समुपदेशन करत रेल्वे पोलीस त्यांना घरी सोडत आहेत.
नंदुरबार रेल्वेस्थानकात वाट चुकून आलेली बालके सहसा आढळून येत नाहीत. परंतु आढळून आल्यास रेल्वे अधिकारी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देत पुढील कारवाई करत आहेत. गेल्या तीन वर्षात घडलेल्या प्रकारात अल्पवयात घेतलेल्या निर्णयांमुळे घर सोडावे लागलेलेच मिळून आले होते. या सर्वांना घराकडे रवाना करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले.
प्रेमाच्या मोहात अल्पवयात घर सोडून आल्याचा निर्णय
पूर्वोत्तर भारतात घराची परिस्थिती बेताची असलेल्या दोन बहिणींचे गावात राहणाऱ्या दोघांसोबत सूत जुळले. अल्पवयीन बहिणी मजल दरमजल करत सुरतला आल्या. चाैघांनी संसारही थाटला, परंतु तो पेलवला न गेल्याने बहिणींना गावाहून घेऊन आलेले दोघेही युवक पसार झाले. या दोघींची फरफट त्यांना नंदुरबारात घेऊन आली होती. रेल्वे पोलिसांनी त्यांची चाैकशी करत त्यांना पुन्हा आसाम राज्यात रवाना केले.
सोबतच उत्तर भारतातून घर सोडून मोठा माणूस होण्याच्या उद्देशाने काही मुले मुंबईकडे जाण्यासाठी आली होती. परंतु पुढे जाण्यासाठी पैसे नसल्याने तीही वाट चुकून नंदुरबार रेल्वेस्थानकात आली होती. त्यांनाही घराकडे पाठवण्यात आले.
वडिलांचे दुसरे लग्न
गुजरात राज्यातील सुरत व इतर शहरांकडे जाणारा मजूर वर्ग हा नंदुरबार मार्गाने जातो. यात अनेक अल्पवयीन कामगारही आढळतात. काही दिवसांपूर्वी एकाची गाडी सुटल्याने तो नंदुरबार स्थानकात काही दिवस थांबून होता. वडिलांनी दुसरे लग्न केल्याने, सावत्र आई त्रास देणार म्हणून तो घराबाहेर पडला होता. कालांतराने तो सुरतकडे रवाना झाल्याची माहिती आहे.
गरिबी प्रमुख कारण
उत्तर भारतातील ग्रामीण भागात असलेल्या गरिबीमुळे अनेक जण गुजरातमध्ये कामाला आले आहेत. त्यांचा गावाकडे रोज संपर्क होतो. यातून मग अल्पवयीन मुले पैशांच्या लालसेने घर आणि गाव सोडून रेल्वेने एकट्याने प्रवास करतात.
नंदुरबार रेल्वेस्थानकात सहसा अल्पवयीन बालके आढळून येत नाहीत. आढळून आल्यास तातडीने रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी माहिती देतात. आमचे कर्मचारीही सातत्याने रेल्वेस्थानकात गस्त करून माहिती जाणून घेतात. परंतु खूप मोठ्या संख्येने मुले आढळून आलेली नाहीत. जे आढळले त्यांची चाैकशी करून योग्य ती माहिती घेत घराकडे रवाना केले आहे.
- दिलीप गढरी, पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस ठाणे, नंदुरबार