नंदुरबार : जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत १ लाख ७२ हजार नागरिकांना या लसींचा डोस देण्यात आला आहे. यातून जिल्ह्यात २. ६० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे; परंतु देण्यात आलेल्या लसींचा पहिलाच डोस दिला जात असल्याने दुसऱ्या डोससाठी नागरिकांची फिरफिर होत आहे.
जिल्हा आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी ४५ ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खाजगी ठिकाणीही लसीकरण केंद्र आहेत. जिल्ह्यात पाच मेपर्यंत २० हजार ३५० कोविशिल्डचे डोस शिल्लक होते. यात ७ मे रोजी २४ हजार ९०० कोविशिल्ड व १२ हजार कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त होणार होते. परंतु सध्या केवळ कोविशिल्डचे डोस मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. यातून ५५ हजार कोविशिल्डचे डोस उपलब्ध असल्याने लसीकरणाने गती पकडली असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र यातील कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस न मिळालेल्या नागरिकांची मात्र फिरफिर होत आहे. आरोग्य विभागाकडून सातत्याने राज्यस्तरावर १२ हजार कोव्हॅक्सिनच्या डोससाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. अद्याप त्यालाही यश आलेले नाही.
४५ केंद्रांवर लसीकरण
प्रारंभी केवळ शहरी भागात शासकीय रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या लसीकरणाला गती यावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सोय करण्यात आली. यातून आजअखेरीस ४५ लसीकरण केंद्रे सुरू आहेत. सोबतच आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात गावोगावी लसीकरण शिबिरांना प्राधान्य देण्यात येत आहे. यातून जिल्ह्याचा लसीकरणाचा आकडा वाढणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.
पहिला डोस घेऊन ३० ते ४५ दिवसांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. जिल्हा रुग्णालयात पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतला होता. यातून दुसरा डोसही कोव्हॅक्सिनचा घ्यावा लागेल; परंतु गेल्या चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात चकरा मारत आहे; परंतु डोस मिळालेला नाही.
-रवींद्र पाटील,
नागरिक, नंदुरबार
आरोग्य विभागाने लसीचा डोस उपलब्ध असल्यास दुसरा डोस दिला पाहिजे. अनेक जण दुसऱ्या डोससाठी फिरत आहेत. विशेष म्हणजे दुसरा डोस उशिरा घेतल्यास काय, याबाबत प्रशासन काहीच सांगत नाही. यातून नागरिकांमध्ये थोडीशी चिंता आहे. कोव्हॅक्सिनचे डोस मागवून ते नागरिकांना दिले पाहिजेत.
-प्रशांत पाटील,
नागरिक, नंदुरबार
काही केंद्रांवर रांगा
जिल्ह्यातील तळोदा, शहादा तसेच नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात आणि शहादा तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सकाळपासून रांगा लागत आहेत. नोंदणी केल्यानंतर अनेक जण सकाळी सात वाजेपासून केंद्रांच्या बाहेर येऊन थांबतात. लस लवकर घेत घरी परतण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु बऱ्याच वेळा केंद्र उशिराने सुरू होणे, इंटरनेट कनेक्शनचा खोळंबा आदी प्रकार होत असल्याचे दिसून आले आहे.
युवकांकडून लसीकरणाला प्रतिसाद
१८ वर्षांवरील युवकांना लस देण्यास प्रारंभ झाला आहे. यातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. विशेष बाब म्हणजे शहरी भागात गर्दी असल्याने अनेक जण शहरापासून जवळ असलेल्या आरोग्य केंद्रांना भेटी देत लसीकरण करत आहेत. दररोज साधारणत: एक हजारच्या जवळपास युवक लसीकरणासाठी नोंदणी करत आहेत. यातून १८ ते ४५ वयोगटातील आठ हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.