नंदुरबार : संशोधकांनी केलेले नवनवीन प्रयोग आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प यावर सातत्याने चर्चा होते. मात्र आदिवासी भागातील रोजंदारीवर जाणाऱ्या एका युवकाने तयार केलेली बॅटरीवरील तीनचाकी अनोखी कार सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
नंदुरबार तालुक्यातील अजेपूर (बंधारपाडा) येथील अर्जुन हिंमतलाल चौरे या युवकाने ही कार बनविली आहे. हा युवक नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी येथील योजनेवर रोजंदारीने कामाला आहे. त्याचे शिक्षण आयटीआय (इलेक्ट्रेशियन) झालेले आहे. आपल्या गावाहून मोटारसायकलने रोज कामावर जाण्यासाठी लागणाऱ्या पेट्रोलचा खर्च वाचविण्याच्या पर्यायातून त्याला ही कल्पना सुचली आणि पाहता-पाहता एक नवीन संशोधन साकारले. त्यामुळे या युवकाच्या आनंदाला पारावार नसून सध्या रोज तो या आपल्या आगळ्यावेगळ्या कारने प्रवास करीत असून परिसरात ही कार चर्चेची ठरली आहे.
या संदर्भात माहिती देताना अर्जुनने सांगितले की, आपले टीव्ही दुरुस्तीचे छोटेसे दुकानही आहे. आपल्याकडे लॅपटॉप आहे, त्यामुळे त्यातून माहिती मिळवून ही कार बनविण्याचे काम आपण हाती घेतले. या कारसाठी स्टिअरिंग, छोटे टायर व इतर साहित्य भंगारातून आणले आहे. त्यासाठी लिथिअम बॅटरी आपण स्वत: बनविली आहे. ४८ व्होल्ट आणि २५ ॲम्पियर अशी तिची क्षमता आहे. तसेच एक सिंगल फेज मोटर त्यासाठी वापरण्यात आली आहे. या कारचे वजन साधारणत: ९० किलो आहे. त्यावर वेग, बॅटरी लेव्हल दाखविणारे इंडिकेटरही जोडले आहेत. सुरुवातीला एवढे वजन घेऊन ही कार चालेल की नाही अशी आपल्याला भीती होती; परंतु ती भीती दूर झाली. या सायकल कारवर दोन सीट सहज बसू शकतात. ताशी ५० किलोमीटर वेगाने ती धावू शकते. त्याला पुढे व मागे धावणारे गिअर बसविले आहेत. त्यामुळे ती रिव्हर्सही जाऊ शकते. एक तास बॅटरी चार्ज केल्यावर ही कार ४५ किलोमीटर धावते. ही गाडी बनविण्यासाठी साधारणत ४० हजार रुपयांचा खर्च आला आहे. सलग १५ दिवसांच्या प्रयत्नानंतर ती आपण बनवू शकलो. सध्या रोज याच कारने आपण महिनाभरापासून अजेपूर ते झराळी असा प्रवास करीत आहोत. यापूर्वी मोटारसायकलने प्रवास करताना आपल्याला पाच वर्षांत ३० हजार रुपये खर्च लागला होता. आता केवळ एक रुपयाच्या चार्जिंगच्या खर्चात आपण ४५ किलोमीटर प्रवास करू शकतो. त्याला इतर दुसरा कुठलाही देखभालीचा खर्च नाही. गाडी बनविल्यापासून रोज भेट देणारे येत आहेत आणि कुतूहलाने त्याची पाहणी करून विचारपूस करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे आता त्यातून नवीन प्रेरणा मिळाली असून, यात पुढे अधिक प्रयोग करून ती चांगल्या पद्धतीने बनविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रयोगाने आपल्याला प्रेरणा मिळाली असून, आता यात सुधारणा करून सौरऊर्जेवर चालणारी आधुनिक गाडी बनविण्याचे आपले स्वप्न आहे. त्यासाठी आपण तयारी करीत आहोत.
- अर्जुन चौरे, अजेपूर, ता. नंदुरबार
फोटो फाईल नेम- 26nclr7.jpg
कॅप्शन- बॅटरीवर चालणारी गाडी चालविताना अर्जुन चौरे.