लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लोकसंघर्ष मोर्चाने एक दिवशीय अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनात विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले.शेतकरी आंदोलन आत्ता एका निर्णायक टप्प्यावर उभे आहे. दिल्लीच्या सर्व सीमांवर दिल्लीत आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व नेत्यांनी आज उपोषण केले आहे. या उपोषणाला पाठींबा देत व देशभरात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समिती च्या वतीने लोकसंघर्ष मोर्चा ने एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. यावेळी आदिवासी हक्क संरक्षण समिती, नर्मदा बचाव आंदोलन, आदिवासी एकता परिषद, कांग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष एमआयएम ,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, यांनीही सहभाग घेतला या वेळी तळोदा, अक्कलकुवा, व धडगांव तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी महिला शेतकरी बांधव या सर्वांनी उपोषण करत आंदोलनात सहभागी दिला. या वेळी सर्वच संघटना व पक्ष यांनी आपली भूमिका मांडत दिल्ली येथील सुरू असलेला शेतकऱ्यांचा लढा हा केवळ पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांचा नसून तो देशातील आपल्या सर्व शेतकऱ्यांचा आहे. सातपुड्यातील आदिवासी समूहांचा आहे व जर मोदी सरकारने हे किसान कायदे मागे घेतले नाहीत तर नंदुरबार जिल्ह्यातून जाणारे सर्व राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे बंद पाडू व आमचे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा दिला. सायंकाळी पाच वाजता सर्व संघटना व पक्षांचे प्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे निवेदन देऊन या आंदोलनाचा समारोप करण्यात आला.या आंदोलनात लोकसंघर्ष मोर्चाचे तळोदा तालुका अध्यक्ष बाबूसिंग नाईक, उपाध्यक्ष दिगंबर खर्डे, दिलवर पाडवी, निशांत मगरे, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष रमेश नाईक, उपाध्यक्ष अशोक पाडवी, धडगांव तालुका अध्यक्ष मुकेश पाडवी, उपाध्यक्ष नारायण पावरा, झिलाबाई वसावे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आदिवासी एकता परिषदेचे वाहरुभाऊ सोनवणे, कांग्रेस पक्षाच्या वतीने दिलीप नाईक, माजी मंत्री पद्माकर वळवी, आदिवासी महासंघाचे भरत वळवी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ईश्वर पाटील, नर्मदा बचाव आंदोलनाचे नारसिंग पटले, एमआयएम चे रफअत हुसेन, लोकसंघर्ष मोर्चाचे झिलाबाई वसावे, मुकेश वळवी, डोंगऱ्या देव माऊली संघटनेचे वासुदेव गांगुर्डे यांनी या वेळी केंद्र सरकारला शेतकरी कायदे मागे घ्या अन्यथा सर्व एकजूट करत आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा देत आपले विचार व्यक्त केलेत. या वेळी कांग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांनीही उपस्थित राहून पाठींबा दिला. यावेळी प्रकाश पाडवी, कुवरसिंग पाडवी, नर्मदा आंदोलनाचे लतिका राजपूत, चेतन साळवे आदी उपस्थित होते.
नंदुरबारला शेतकरी आंदोलनाला पाठींब्यासाठी लाक्षणीक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 12:47 IST