लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात दोन ठिकाणी घरफोडी झाली तर एका ठिकाणी प्रयत्न करणारा जेरबंद झाला. एका ठिकाणी सात हजार, दुसऱ्या ठिकाणी २७ हजाराचा ऐवज लांबविला. तर योगेश्वरी नगर भागात एकास चोरीचा प्रयत्न करतांना अटक करण्यात आली. या घटनांमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.नंदुरबारातील गोकुळधाम परिसरात राहणारे सागरसिंग दिवल्या वसावे यांच्या घरात चोरी झाली. त्यांच्या फिर्यादीवरून राणूबाई काळूसिंग वसावे, रा.बारीसुगरस, ता.अक्कलकुवा यांनी वसावे यांचा बंद घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरातील २२ हजार रुपये किंमतीचे चांदीचे कडे व पाच हजार रुपये रोख चोरून नेले. याबाबत सागरसिंग वसावे यांनी फिर्याद दिल्याने राणूबाई यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गवळी वाड्यात कुलूप तोडलेदुसरी घटना गवळीवाडा भागात घडली. शहरातील गवळीवाडा भागात घरफोडीत चोरट्यांनी सात हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गवळीवाड्यातील बंडू नाना गवळी हे रिक्षा चालवतात. त्यांच्या बंद घरातून चोरट्यांनी रोख सात हजार रुपये चोरून नेले. चोरट्यांनी कुलूप तोडून ही चोरी केली. या प्रकरणी परिसरात खळबळ उडाली आहे. बंडू गवळी यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार बहिरम करीत आहे. हातावर पोट असलेल्या कुटूंबाच्या घरात ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.एकाला अटकयोगेश्वरीनगर माळीवाडा भागात राहणारे धर्मेंद्र पांडूरंग पाटील यांच्या घरात एकाला चोरीच्या उद्देशाने घुसल्याने ताब्यात घेण्यात आले. राज नारायण थनवाल, रा.मेहतर वस्ती असे संशयीताचे नाव आहे. रात्री दोन वाजेच्या सुमारास राज थनवार हा धर्मेंद्र पाटील यांच्या घरात घुसला. आवाज आल्याने पाटील व परिवार उठले असता त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना कळवून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार पाटील करीत आहे. दरम्यान, शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
दोन ठिकाणी यशस्वी तर एक ठिकाणी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:21 IST