नंदुरबार : जिल्ह्यात प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी गळतीचे आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. परंतु जिल्ह्यातील उर्दू प्राथमिक शाळांमधील गळतीचे प्रमाण अवघे ४.२ टक्के आहे. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे माध्यमिक शाळांमध्ये मात्र, शिक्षणाचे प्रमाण अगदीच कमी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ३५ उर्दू प्राथमिक शाळांपैकी २५ शाळा डिजीटल करण्यात आल्या असून व्हर्च्यूअल लर्निंगला प्राधान्य दिले जात आहे.जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण दर्जेदार व्हावे यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केला जात आहे. त्यात अल्पसंख्याक असलेल्या उर्दू प्राथमिक शाळा देखील मागे नसल्याची स्थिती आहे. पालिका आणि जिल्हा परिषदेअंतर्गत उर्दू शाळा चालविल्या जातात. त्यांच्यातील विद्यार्थी संख्या देखील समाधानकारक आहे. परंतु प्राथमिक शाळेतून माध्यमिकला गेल्यानंतर विद्यार्थी संख्या अगदीच रोडावते. असे विद्यार्थी स्वयंरोजगाराला प्राधान्य देवून आपल्या कुटूंबाला हातभार लावत असल्याचे सर्व्हेक्षण देखील यापूर्वी करण्यात आलेले आहे.जिल्ह्यात उर्दू माध्यमाच्या एकुण ३५ शाळा आहेत. या सर्वच शाळांमध्ये दर्जेदार आणि चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे लोकसहभाग देखील घेतला जातो. त्यामुळे २५ शाळा या डिजीटल झालेल्या आहेत. उर्वरित शाळा देखील लवकरच डिजीटल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय उर्दू की तालीमी संदूक या शैक्षणिक साहित्य विषयक पेटी वापरण्याचे प्रशिक्षण सर्व उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना देण्यात आले आहे. उर्दू शाळांसाठी १०० टक्के मुलभूत वाचन क्षमता कार्यक्रमचा पहिल्या टप्प्याची देखील अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करून साहित्य निर्मिती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे स्थलांतर १०० टक्के रोखण्यात आले आहे. रिक्त पदाची संख्या ही नेहमीच डोकेदुखी ठरली आहे.जिल्ह्यातील या शाळांमध्ये गणितत व विज्ञान विषयाची रिक्त पदे देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. एकुण १७ पदे रिक्त असून पवित्र प्रणालीमध्ये पद भरण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. गुणवत्ता सुधारसाठी देखील विविध माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यांना देखील बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे.
विद्यार्थी गळतीचे प्रमाण अवघे चार टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 18:10 IST