प्रकाशा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला १३ गावे व पाच उपकेंद्रे जोडलेली आहेत. सुमारे ५० हजार लोकसंख्येच्या आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना प्रकाशा येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले.
प्रकाशा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे व मध्यवर्ती गाव आहे. तसेच महाराष्ट्रासह गुजरात-मध्य प्रदेश येथील भाविक दर्शनासाठी वर्षभर येत असतात. या गावाला दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. वर्षभरामध्ये लाखो भाविक याठिकाणी येत असतात.
प्रकाशा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, या आरोग्य केंद्राला प्रकाशासह वैजाली, नांदरखेडा, करणखेडा, नांदर्डे, डांमरखेडा, बुपकरी, करजई, पळासवाडा, शेल्टी, वर्धे, टेंबे, अशी तेरा गावे जोडली आहेत. त्यामुळे या सर्वांचा विचार करता आरोग्यसेवा परिपूर्ण मिळावी म्हणून प्रकाशा येथे ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे.
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग व विसरवाडी-सेंधवा व नंदुरबार ते तोरणमाळ हे तिन्ही महामार्ग प्रकाशा येथे जोडले आहे. त्यामुळे वेळोवेळी होणारे अपघात व शवविच्छेदनासाठी रुग्ण व अपघातातील मृत व्यक्तीला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात जावे लागते. प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक स्वरूपाचे उपचार मिळत असून, गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालय अथवा म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे प्रकाशा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्यास परिसरातील रुग्णांना प्रकाशा येथे उपचार उपलब्ध होतील व गोरगरीब मजुरांचा शहादा, नंदुरबार, तळोदा येथे जाण्यासाठी वेळ व पैसेदेखील वाचेल. ही समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी प्रयत्न करावा, असे ग्रामस्थांनी सांगितले.
सध्या भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. त्या निमित्तानं नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आल्या असून, त्यांच्या सहाय्यकांंना या संदर्भातील निवेदन भाजप युवा मोर्चा पदाधिकारी, भाजप युवा वॉरियर्स पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते विनोद ठाकरे, पंडित भोई, पंकज कोळी, अविनाश शिरसाठ, हिमांशू तांबोळी, दर्शन सोनार, राजेंद्र पाडवी, ऋषिकेश शिंपी, लखन सोनार, मयूर पाटील, गौरव चौधरी, अक्षय भावसार यांनी दिले.