n लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कुणबी सेनेतर्फे शहादा येथे रविवारी नंदुरबार जिल्हा समाज मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कुणबी सेनेचे प्रदेश अध्यक्ष विश्वनाथ पाटील होते.शहादा येथील लोणखेडा बायपास रस्त्यावर असलेल्या केशरानंद लॉनमध्ये हा मेळावा घेण्यात आला. या वेळी राज्य उपाध्यक्ष युवराज पाटील, नंदुरबार जिल्हा कुणबी सेनेचे संपर्क प्रमुख गणेशराजे पाटील, डॉ.विवेक पाटील, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय बोरसे, दिनेश निमसे, योगेश निपूर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन मेळाव्यास सुरुवात झाली. जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच हा मेळावा झाल्याने जिल्ह्यातून समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या वेळी विश्वनाथ पाटील म्हणाले की, जगाचा खरा पोशिंदा कुणबी शेतकरी आहे. याच शेतकऱ्यांच्या नावावर सर्वच राजकीय पक्षांनी राज्य केलेले आहे. ५० वर्षात हजारो शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करावी लागली आहे. बळीराजाचे मत घेऊन नेते पोसले जात आहे. यापुढे यापुढे कुणबी समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी कुणबी समाज पक्ष विरहित संघटना जबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या राज्यातील सर्वच पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करीत आहेत. मात्र छत्रपतींचा कुणबी समाज हालअपेष्टा सहन करीत जीवन जगत आहे. कुणबी समाज सर्वत्र विखुरला गेला आहे. शेतकऱ्यांचे दुःख, आरक्षणाचा प्रश्न असे विविध प्रश्न राज्यात असून या राज्यातील कुठलाही राजकीय पक्ष या प्रश्नांची मुळापासून उकल काढण्याकरिता तत्पर राहिलेला नाही. राज्यात आता समाज संघटनासाठी पक्षविरहित कुणबी समाज संघटना सक्षम होण्यासाठी राज्यभर संघटना मजबूत व्हावी यासाठी हा कुणबी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्यात युवराज पाटील, गणेशराजे पाटील यांचीही भाषणे झाली. या वेळी नंदुरबार जिल्हा कुणबी सेनेच्या वेबसाईटचे लोकार्पणही विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रास्ताविक योगेश निपूर्ते यांनी तर सूत्रसंचालन प्रा.भूषण निकम यांनी केले. मेळाव्यास शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, साक्री, धुळे आदी ठिकाणाहून समाज बांधव उपस्थित होते.
कुणबी सेनेतर्फे समाज मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 12:37 IST