n लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची समस्या असली तरी काही शिक्षक प्रामाणिकपणे आपली सेवा बजावून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील ४७ टक्के शाळांमध्ये ऑनलाईन तर ५३ टक्के शाळांमध्ये ऑफलाईन शिक्षण सुरू असल्याचा दावा प्राथमिक शिक्षण विभागाचा आहे. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पहाता ४५ टक्के दुर्गम भागात शिक्षणाच्या विविध अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी वर्षानुर्ष प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या काळात शाळा बंद परंतु शिक्षण सुरू हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. ऑनलाईनसाठी अनेक अडचणी आहेत. जिल्ह्यातील ६५ टक्के पेक्षा अधीक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही. इंटरनेट कनेक्टीव्हिटीची अडचण आहे. मोबाईल साक्षरता नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण दुर्गम भागात कसे मिळेल हा प्रश्नच आहे. सध्या मोठी अडचण येत आहे ती स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांच्या पाल्यांची. असे पालक आपल्या पाल्यांनाही सोबत घेऊन जात आहेत. काही ठिकाणी पाल्यांना स्थानिक ठिकाणी शेतात मजुरीसाठी देखील नेले जात आहे. अशा वेळी कसे आणि कोणते शिक्षण दिले जाणार हा प्रश्नच आहे. काही शिक्षकांनी सुरुवातीपासूनच आपल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न चालविला आहे. अगदी पुस्तक वाटप करण्याच्या दिवसापासून असे शिक्षक मेहनत घेत आहेत. ऑनलाईन नाही तर किमान ऑफलाईन अर्थात विद्यार्थ्यांंपर्यंत जाऊन ते शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा शिक्षकांची मिडीया आणि शिक्षण विभागाने देखील वेळोवेळी दखल घेतली आहेच. परंतु अद्यापही अनेक शिक्षक असे आहेत ज्यांनी केवळ पुस्तक वाटप करण्यापुरतेच आपल्या शाळेचे तोंड पाहिले आहे. अशा शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांंचे होणारे शैक्षणिक नुकसानीबाबत काहीही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. अशांबाबत शिक्षण विभागाने कडक धोरण अवलंबणे आवश्यक आहे. एकुणच जिल्ह्यातील दुर्गम भागापेक्षा सपाटीवरील भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी शिक्षण मिळत आहे. दुर्गम भागात देखील अनेक शिक्षक अडचणींवर मात करून आपले कर्तव्य निभावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.
काल्लेखेतपाडा शाळाकाल्लेखेतपाडा, ता.धडगाव येथील ‘बयडी’वाली शाळा राज्यभर गाजली आहे. नैसर्गिक वातावरणात मुलं शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मुले ज्या ठिकाणी गुरे चारण्यासाठी जातात त्याच ठिकाणी जाऊन शिक्षण देण्याचा हा अनोखा प्रयत्न या शाळेचे शिक्षक रुपयेश नागालगावे यांनी चालविला आहे. राज्यभरात काैतूक झाले आहे.
जि.प.शाळा, प्रकाशाजिल्हा परिषद शाळा प्रकाशा येथील शिक्षक दाम्पत्याने स्वखर्चाने डिजीटल शिक्षणरथ तयार केला आहे. गावातील विविध भागातील विद्यार्थींनींना त्या त्या भागात एकत्र आणून एलईडी स्क्रीनद्वारे शिक्षण देण्याचा रवींद्र व प्रियंका पाटील या दाम्पत्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थीनींचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जि.प.शाळा, बोरवणशाळा उघडल्याच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पुस्तके व वह्या वाटप केल्या. दोन घरे मिळून विद्यार्थ्यांना एकत्र करीत त्यांच्या अडचणी सोडविल्या. शनिवार माझा आवडीचा हा उपक्रम राबवून या दिवशी दप्तरमुक्त शाळा राबविणारे दिलीप गावीत या शिक्षकांची दखल देखील राज्यस्तरावर घेतली गेली आहे.
रनाळे कन्या शाळारनाळे येथील जिल्हा परिषद कन्या शाळेने देखील शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरू केले. शिक्षकांनी घरोघरी जाऊन तसेच शाळेच्या डिजीटल इंटर ॲक्टीव्ह रूमद्वारे शिक्षण दिले जात आहे. शाळेचे मुख्याध्यापक अमृत पाटील व त्यांचे सहकारी यासाठी प्रयत्नशील आहेत. शिक्षणासोबतच पर्यायी उपक्रम देखील घेत आहेत.
जि.प.शाळा, भागापूर भागापूर येथील जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विविध उपक्रम राबविले. झाडाखालची शाळा अर्थात विद्यार्थ्यांना दिलेल्या स्वाध्याय पुस्तीका झाडाखाली बसवून, घराच्या ओट्यावर सोशल डिस्टन्सिंग पाळत सोडवून घेतल्या जात आहेत. मुख्याध्यापक कोळी यांच्यासह सर्व शिक्षक त्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू आहे. दिशा अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शाळा बंद पण शिक्षण सुरू हा उपक्रम कायम ठेवला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. वेळोवेळी केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून देखील आढावा घेत आहोत.-भानुदास रोकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नंदुरबार.