नंदुरबार : ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक नवनवीन ॲप आले आहेत. त्यावर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जात आहेत. परंतु हेच ॲप शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांची डोकेदुखी ठरत आहेत. परिणामी विद्यार्थी संभ्रमात पडत असून पालकांना चिंता लागली आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रत्यक्ष शाळा सुरू व्हावी यासाठीही पालकवर्ग आग्रही असल्याचे चित्र आहे.
गेल्या दीड वर्षांपासून शाळा, कॉलेज व क्लासेस ऑनलाईन सुरू करण्यात आले आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक फुकटचे ॲप कार्यान्वित झालेले आहेत. काही दिवसापासून हेच ॲप शाळा व पालकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. बऱ्याचदा ऑनलाईन वर्ग सुरू असताना वेगवेगळे मेसेज, व्हिडिओ अचानक सुरू होतात. सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा झाले आहेत. यामुळे पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ऑनलाईन शिक्षण सुरू असल्यामुळे पालकांना नाईलाजाने विद्यार्थ्यांना नवीन मोबाईल घेऊन द्यावे लागत आहेत. विद्यार्थी कुतूहलापोटी व उत्सुकतेपोटी लिंकला छेडतात. आणि त्यातून काहीही सुरू होत असते.
शाळांनी ही घ्यावी काळजी
ऑनलाईन वर्ग सुरु होण्याआधी अर्धा किंवा एक तास आधी त्याची लिंक द्यावी. तीदेखील विद्यार्थी वगळता कुठेही शेअर होता कामा नये. रोजच्या रोज नवीन मीट कोड अपडेट करावा. शाळांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा आयडी तयार करावा. इतर कोणालाही त्याचे ॲक्सेस देऊ नयेत. गोपीनीयतेचा भंग होणार नाही यासाठी शिक्षकांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. एखादा शिक्षक जर ऑनलाईन वर्ग घेत असेल, त्या शिक्षकाला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची ओळख असायला हवी. ऑनलाईन वर्गात खोड काढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत चौकस असण्याची गरज आहे.
असेही घडू शकते
काही खोडसाळ मुलं ऑनलाईन क्लास सुरू असतांना मेसेज टाकणे, फोटो टाकणे किंवा व्हिडिओ टाकण्याचे प्रकार करू शकतात. अशा वेळी शिक्षकांनी देखील दक्ष राहावे व अशा बाबी लागलीच पालकांना कळवाव्या. दहावीनंतर मुलांमुलींना बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींची जाण असते. ऑनलाईनचे जितके फायदे तितकेच तोटे आता निदर्शनास येत आहेत.
पालक, शिक्षकांनीही दक्षता घ्यावी...
ऑनलाईन क्लास किती वाजता असतो, किती वेळ चालतो याची माहिती पालकांनी ठेवणे आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त मोबाईल देऊ नये. आपला पाल्य शिक्षणाच्या नावाखाली इतरत्र चॅटींग, गेम खेळत आहे याबाबत पालकांनीच दक्ष असणे गरजेचे आहे. बहुतांश विद्यार्थी गेमच्या आहारी गेलेले आहेत. शक्यतो ऑनलाईन वर्गानंतर मुलांकडे मोबाईल देऊच नये. जे मुले जास्त आहारी गेले असतील त्यांचे मानसोपचारतज्ज्ञाकडून समुपदेशन करावे.
ऑनलाईन शिक्षण आता अनिवार्यच आहे. शिक्षणासाठी वेगवेळे मोबाईल ॲप वापरताना ते किती फायदेशीर आहेत याचा विचार करूनच ते डाऊनलोड करावे. मुलं मोबाईलच्या जास्त आहारी जाणार नाहीत याची काळजी प्रत्येकानेच घ्यावी. काही तक्रारी असल्यास सायबर सेल पोलिसांकडे संपर्क साधावा.
-रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, नंदुरबार.