लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : तालुक्यात संततधार पावसाचा जोर कायम असून लघु व मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरले आहेत़ सर्वाधिक मोठय़ा रंगावली प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागल्याने तालुक्यात आनंद व्यक्त होत होता़ तालुक्यात आतार्पयत सरासरी 55 टक्के पाऊस झाला आह़ेतालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान एक हजार 100 मिलीमीटर आहे. तालुक्यात जून व जुलैचे पहिले दोन आठवडे जवळपास कोरडे गेले. पिण्याच्या पाण्याची कधी नव्हे एवढी भिषण स्थिती ग्रामीण व शहरी भागात अनुभवास आली. जुलैच्या तिस:या आठवडय़ात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी तर दुसरीकडे गारवा निर्माण झाल्याने उकाडय़ामुळे त्रस्त झालेले नागरिकही सुखावले. पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याने चिंता दूर होउन बळीराजाही आनंदीत झाला. गत आठवडय़ात या हंगामाचा सर्वात चांगला पाऊस झाला. गेल्या दहा दिवसात 380 मिलीमीटर पाऊस झाला. आज अखेर 657 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या 55 टक्के पाऊस झाल्याने सर्वत्र उत्साह आहे. जिल्ह्यातील सर्वात जुना रंगावली मध्यम प्रकल्प गत 10 दिवसात झालेल्या पावसामुळे क्षमतेएवढा भरल्याने शुक्रवारी सकाळी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी वाहुन निघाले. नवापूर शहराचा पाणी पुरवठा रंगावलीच्या पाणी साठ्यावर अवलंबून आहे. दरवर्षी जुलैच्या दुस:याच आठवड्यात भरुन निघणारा हा प्रकल्प ऑगस्ट उजाडल्यावर भरल्याने शहरवासीयांच्या चिंताही कमी झाल्या आहेत. विसरवाडी जवळील नागन व खांडबारा भागातील कोरडी मध्यम प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहे. यासह रायंगण, मुगधन, सुळी यासारखे तालुक्यातील 32 लघु प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला आहे.दरम्यान संततधार पावसामुळे धायटे भागातील बिलबारा गावातील एक घर कोसळले. सुदैवाने घरातील दोन्ही चिमुकल्यांसह महिला बालंबाल बचावले.
रंगावली प्रकल्प ओसंडून वाहू लागल्याने नवापुरचा पाणी प्रश्न मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:53 IST