लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोबाईल दुरूस्ती व विक्रीच्या दुकानातून पावणेपाच लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीस गेलेले सर्वच मोबाईल जप्त करण्यात आले आहे. एलसीबीने ही कारवाई केली. नंदुरबारातील नवशक्ती कॅाम्पलेक्समधील दुकानातून ३ डिसेंबर रोजी तब्बल ३४ मोबाईल चोरीस गेले होते. एलसीबीने तपास करून ५ डिसेंबर रोजी एका महिलेसह व्यक्तीला अटक केली होती. त्यांच्याकडून सात मोबाईल जप्त करण्यात आले होते. परंतु मुख्यसूत्रधार हाती लागत नव्हते. पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यावरून गिरिविहार भागातील दोन बालकांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. शिवाय मोबाईल लपविलेली एमएल टाऊनमागील पडीत जागा दाखविली. तेथे बाभळीच्या झाडाखाली खड्डा खोदून बॅगेत लपविलेेले तब्बल ५६ मोबाईल काढून दिले. त्या मोबाईलची किंमत चार लाख ७० हजार रुपये इतकी आहे. दोघा अल्पवयीन बालकांना शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक विजयसिंग राजपूत, हवालदार प्रमोद सोनवणे, राकेश मोरे, दादाभाई मासुळ, पुष्पलता जाधव, आनंदा मराठे, अभय राजपूत यांच्या पथकाने केली. चोरीचा संपुर्ण माल हस्तगत केल्याने पथकाचे पोलीस अधीक्षकांनी कौतूक केले.
पावणे पाच लाखाचे मोबाईल केले हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:19 IST