जयनगर : कोरोना महामारीचा सर्वांत मोठा घातक परिणाम जर कोणावर होत असेल तर तो प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर होत आहे. माध्यमिक शाळेतील मुले कोरोनाची लाट ओसरल्यानंतर शाळेत जात आहेत. गेल्या दीड वर्षांपासून प्राथमिक शाळेतील मुलांनी शाळेचे तोंड पाहिले नाही. मुले ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. मात्र, सगळ्याच मुलांना ही सुविधा भेटत नसल्यामुळे त्यांचे भविष्य खराब होऊ नये, म्हणून पालक खासगी शिकवणीला प्राधान्य देत आहेत.
अनेक देशांमध्ये शाळा चालू आहेत. यामध्ये मग प्राथमिक वर्ग असतील किंवा महाविद्यालयीन वर्ग असतील. मात्र, भारतामध्ये शाळा सुरू करण्याच्या बाबतीत शासनाने अजूनही गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाहीये. शाळा चालू होण्याची घोषणा होते. परंतु परत मागे घेतली जाते. एकंदरीत अजूनही प्राथमिक शाळेचे वर्ग चालू होत नसल्यामुळे मुलांच्या भविष्यावर खूप वाईट परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. आज शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. सगळीकडे महामंडळाच्या बसेस चालू आहेत. बाजारांमध्ये शिथिलता देऊन शासनाने जशीच्या तशी गर्दी करून घेतली आहे. खासगी कार्यालय १०० टक्के हजेरीने चालू केले आहेत. शाळा ही एक अशी वास्तू आहे, जिथे विद्यार्थी शिस्तीने वर्गात बसलेले असतात. शिक्षकही विद्यार्थ्यांना शिस्त लावून शिकवीत असतात. तिथे गर्दी कधीच होऊ शकत नाही. मात्र, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की, जिथे शिस्त नाही तिथे गर्दी होत आहे. शाळेत तर ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली असतात तेच विद्यार्थी शाळेत जात असतात. मग तेथेच कोरोना पसरू शकतो का? हॉटेल्स, दुकाने, बाजार, खासगी कार्यालय, सरकारी कार्यालय यांच्यामध्येही गर्दी होताना दिसत आहे. मग तेथे कोरोना पसरू शकत नाही का? मग मुलांच्या भविष्यावरच शासनाने गदा का आणून ठेवली आहे. शासन ऑनलाइन शिक्षणाचा बाऊ करत असले तरी ऑनलाइन शिक्षणाचा फायदा सगळ्याच मुलांना होत नाहीये. म्हणून ग्रामीण भागात खासगी शिकवणीला पालक प्राधान्य देताना दिसून येत आहेत.
आपल्या वर्ग मित्रांना भेटण्यासाठी मुले आसुरलेली -
दीड वर्षापासून प्राथमिक शाळेतील मुले शाळेत गेलेली नाही. त्यामुळे आपल्या वर्ग मित्रांना भेटण्यासाठीही मुले आसुरलेली आहेत. मुले शाळेत एकमेकांना भेटल्यावर तू हा होमवर्क केला का? तुला हे उदाहरण सोडवता आले का? अशा प्रकारची हितगुज त्यांच्यामध्ये होत असते. मात्र, शाळा चालू होत नसल्यामुळे अशा संभाषणापासून मुले दुरावलेली आहेत.
माझा मुलगा इयत्ता पहिलीला असून, प्राथमिक शाळेतील शिक्षक अभ्यासाचा पीडीएफ फाइल पाठवत आहेत. मात्र, त्याच्यात पीडीएफ ओपन होण्यापासून ते अभ्यास सोडवण्यापर्यंतचा प्रवास किचकट असल्यामुळे शिक्षकांनी पाठविलेली पीडीएफचा काही उपयोग होत नाहीये. म्हणून आम्ही गावातच आमच्या मुलाला खासगी शिकवणी लावून दिलेली आहे.
- प्रियंका खलाणे, जयनगर, ता. शहादा