नंदुरबार : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी यंदा जिल्हा आरोग्य विभागाला ३५ हजार गर्भवती मातांची नोंदणी करून लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु विभागाने गत पाच महिन्यातच ३५ हजार मातांची नोंदणी पूर्ण केली असून, यातील ५० टक्के मातांना पहिला हप्ताही वितरित करण्यात आला आहे.
मातृवंदना योजनेंतर्गत पहिले अपत्य असलेल्या मातेला ५ हजार रुपयांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मातांची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य उपकेंद्र, तसेच आशा सेविकांकडून करण्यात येत आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागासह सपाटीच्या तालुक्यात ग्रामीण जनता या याेजनेत सहभागी होत आहे. त्यांच्याकडून मातांची नोंदणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. आदिवासी संवर्गातील मातांसोबतच इतर सर्व स्तरातील मातांना लाभ मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून गेल्या वर्षात अत्यंत वेगाने या योजनेंतर्गत नोंदणी करण्यात येत आहे. येत्या आठ महिन्यांत मातांची संख्या वाढल्यास त्यांचीही नोंदणी होणार आहे. गर्भवती मातांना पहिल्या टप्प्यात १०० दिवसांच्या आत नोंदणी केल्यानंतर १ हजार, गरोदरपणाच्या सहा महिन्यात एक प्रसूतीपूर्व तपासणीनंतर दोन हजार, तर बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे तीन महिन्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार, असा एकूण पाच हजाराचा लाभ मातांना देण्यात येत आहे.
पहिले अपत्य असलेल्या सर्व मातांना हा लाभ देण्यात येत आहे. पहिला, दुसरा व तिसरा लाभ मिळविण्याकरिता आधारकार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेराॅक्स, पतीचे आधारकार्ड, बाळाच्या जन्माचा दाखला, माता बाल संरक्षण कार्ड यांची प्रत मातांनी दिल्यानंतर त्यांची नोंदणी केली जात आहे.
दरम्यान, मातांना जननी सुरक्षा योजनेंतर्गत त्या योजनांच्या निकषानुसार अतिरिक्त लाभही देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून दुर्गम भागासह जिल्ह्यात सर्वत्र या योजनेबाबत जनजागृती करण्यात आली असल्याने नोंदणी गतिमान पद्धतीने होत असल्याची माहिती दिली गेली आहे.
लाभासाठी कोठे करायचा संपर्क...
जिल्ह्यात एकूण ६० प्राथमिक आरोग्य केंद्रे, २९० पेक्षा अधिक उपकेंद्रे, १२ ग्रामीण रुग्णालये, दोन उपजिल्हा व एक जिल्हा रुग्णालय आहे. याठिकाणी पहिल्या अपत्यावेळी गर्भवती असलेल्या मातांना नोंदणी करता येणार आहे. सोबतच आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका यांनाही संपर्क करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात काम करणाऱ्या १ हजार ८०० पेक्षा अधिक ‘आशां’नीच मातांची नोंदणी करून घेतली आहे.
दरम्यान, योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. बोडके यांना संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. त्यांची बदली झाल्याने नवीन अधिकारी चार्ज घेत असल्याची माहिती दिली गेली. योजना गतिमान पद्धतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले.