भूषण रामराजे लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जून ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यातील ३५ हजार शेतकर्यांच्या १५ हजार हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून १० कोटी रूपयांची नुकसान भरपाई प्रस्तावित करण्यात आली आहे. गेल्या वर्षाची अतीवृष्टी, लांबलेला कापूस आणि त्याची विक्री सुरू होत नाही तोच आलेला कोरोना यातून सावरलेला शेतकरी पुढे निघाला असताना पुन्हा पावसाने जोर लावत नुकसान केले आहे. या नुकसानीने शेतकरी कोलमडले असून शासनाने पंचनामे केल्याने भरपाईची प्रतिक्षा आहे.
सोयाबीनचे नुकसान यंदाच्या वर्षात सोयाबीन व ज्वारी पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे. यात सोयाबीनचे सर्व सहा तालुक्यात १ हजार ९४० हेक्टर तर ज्वारीचे २ हजार २५४ हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. कडधान्य पिकांचे यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक ६ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.
१५ हजार शेतकरी बाधितजून ते सप्टेंबर या काळात झालेल्या पावसामुळे ३५ हजार ९०९ शेतकर्यांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले आहे. एकूण १५ हजार ५३५ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे हे नुकसान झाले असून या नुकसानीच्या भरपाई पोटी १० कोटी ९० लाख रूपयांची भरपाई प्रस्तावित असून आयुक्ताकडे प्रस्ताव दिला गेला आहे.
धडगाव व नवापूरात नुकसान जून ते सप्टेबर या काळात नंदुरबार तालुक्यात ६०२, नवापूर ५ हजार ५५१, अक्कलकुवा २ हजार ५९९, शहादा १ हजार २१८, तळाेदा ३३५ तर धडगाव तालुक्यात ५ हजार २२६ हेक्टर नुकसान झाले आहे. नवापूर तालुक्यात ७०० हेक्टर भात तर धडगाव तालुक्यात मूूग व उडीद पिकांचे सर्वाधिक नुकसान आहे.