गेल्या वर्षी नंदुरबार जिल्ह्यात कोरोना आजार जास्त प्रमाणात असल्यामुळे कानुबाई सण उत्सव सोप्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. तसेच भाविकांनी कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमाचे पालन केले होते. मात्र, या वर्षी जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला आहे. तरी नागरिकांनी कोरोनाची साथ वाढणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी प्रमाणे नियम पाळून कानुबाई माताचा उत्सव साजरा करावा. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात कोरोनाबाधित होते. मात्र, यावर्षी कोरोना नियंत्रणात आला आहे. म्हणून प्रशासन खान्देशातील आराध्यदैवत असलेल्या कानबाई माता उत्सवासाठी कोरोना नियमात शिथिलता आणतील अशी आशा जिल्हावासीयांना लागली आहे.
कानबाई उत्सवाची तयारी आठ दिवस अगोदरच सुरू होते. घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासूनपुसून स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुऊन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान- मोठ्या पुरुषांना मोजून प्रत्येकाची सव्वा मूठ असे धान्य म्हणजे गहू, हरभऱ्याची डाळ घेतली जाते. पुरणपोळी, खीर, कटाची आमटी, हरभऱ्याची डाळ घालून गंगाफळ तथा लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा-लसूण वर्ज्य असतो. कानबाई परणे परनून आणलेले नारळ धुऊन घेतात. त्यालाच नथ, डोळे, बसवून इतरही पारंपरिक दागिने घालतात. केळीचे व कण्हेरीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेवून तिची स्थापना केली जाते. कण्हेरीला खानदेशात फार महत्त्व आहे. काही गाण्यांमध्ये कण्हेरीलाच कानबाई असे संबोधले जाते. कलशावर गळ्यातले हार, मणी- मंगळसूत्र चढवले जाते. वरून शेवंतीची वेणी लावून ओढणी लावली जाते. आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट- लाटणे, तवा हे सगळं कणकेचेच करतात. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेऊन कानबाईच्या दर्शनाला येतात. सोमवारी पूर्ण गावांतील कानबाईंची विसर्जन मिरवणूक एकाचवेळी निघते. ढोल-ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेवून महिला नदीवर निघतात. फुगड्या खेळल्या जातात. वाजतगाजत जाताना समोरून दुसरी कानबाई आली, तर दोन्ही कानबायांची चौरंग जोडून भेट घडवली जाते. नदीवर विसर्जन होते. परंतु गेल्या वर्षी विसर्जन सोप्या पद्धतीने करण्यात आले होते. तसेच यावर्षी कानुबाई उत्सवासाठी कोरोना नियमांत प्रशासन शिथिलता आणतील का हे पाहणे औचित्याचें ठरणार आहे.