तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी रोझवा, पाडळपूर, गढावली व सिंगसपूर या लघुसिंचन प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. रोझवा प्रकल्पाची जलसाठ्याची क्षमता एकूण १.७४ दशलक्ष घनमीटर आहे, तर पाडळपूर प्रकल्पाची क्षमता १.७० दशलक्ष घनमीटर, गढावली प्रकल्पाची ०.९४ दशलक्ष घनमीटर, सिंगसपूर प्रकल्पाची २.२७ दशलक्ष घनमीटर आहे. धनपूर सिंचन प्रकल्पातही पाणीसाठा करण्यात आला होता. त्याची जल साठवणूक क्षमता ३.१८ दशलक्ष घनमीटर एवढी आहे.
यावर्षी तळोदा तालुक्यातील पावसाळ्यात सुरुवातीपासून पर्जन्यमान कमी राहिले आहे. त्यामुळे दरवर्षी ओसंडून वाहणाऱ्या या प्रकल्पांमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अत्यल्प जलसाठा झाला आहे. रोझवा प्रकल्पात ऑगस्ट महिन्याच्या अखेर ०.१९ दशलक्ष घनमीटर म्हणजे सुमारे ११ टक्केच जलसाठा होऊ शकला होता. पाडळपूर प्रकल्पात ०.०७ दशलक्ष घनमीटर एवढा म्हणजे केवळ चार टक्के जलसाठा आतापर्यंत होऊ शकला आहे. सिंगसपूर लघुसिंचन प्रकल्पात आतापर्यंत ०.८४ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४० टक्क्यांपर्यंत जलसाठा झाला आहे. कमी पर्जन्यमानामुळे गढावली प्रकल्पात आतापर्यंत ०.०५ दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ पाच टक्के जलसाठा होऊ शकला आहे. धनपूर या प्रकल्पात ऑगस्ट अखेरीपर्यंत जलसाठाच झालेला नव्हता. गेल्यावर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत रोझवा व पाडळपूर प्रकल्पांसह आजच्या घडीला या सर्वच लघुसिंचन प्रकल्पातील जलसाठा अत्यल्प आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रोझवा व पाडळपूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरले होते. मात्र, या वर्षी तालुक्यातील सर्वच लघुसिंचन प्रकल्पांतील जळसाठ्याची स्थिती चिंताजनक असून, कमी पर्जन्यमान व प्रकल्पात अत्यल्प जलसाठा यामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे हे प्रकल्प परिसरातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत असल्याचे गेल्या अनेक वर्षांचे चित्र आहे. या प्रकल्पातील जलसाठ्यावरच परिसरातील शेती अवलंबून असते. शिवाय वर्षभर परिसरातील भूगर्भातील पाणी पातळीही या प्रकल्पातील जलसाठ्यावर अवलंबून असते. तालुक्यातील सर्वच प्रकल्पांतील अत्यल्प जलसाठ्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पावसाळ्यात हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरू न शकल्याने भूजल पातळी उन्हाळ्यात खालावण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक कूपनलिका आटण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. प्रकल्पात पावसाळ्यात पुरेसा जलसाठा झाला नाही तर ५०० ते ७०० फूट कूपनलिका करूनही पाणी लागत नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
प्रकल्पांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रोझवा, पाडळपूर ,सिंगसपूर, गढावली या चारही लघुसिंचन प्रकल्पांमध्ये दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात जलसाठा होत असतो. परंतु, या प्रकल्पात होणारा जलसाठा फारच अल्पायुषी ठरत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. या प्रकल्पातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे दररोज हजारो लीटर पाणी वाहून जाते. यावर्षी या प्रकल्पात अत्यल्प जलसाठा झाला आहे. परंतु दरवर्षी १०० टक्के भरूनही संवर्धनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. या लघुसिंचन प्रकल्पाच्या दूरवस्थेकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जात असल्याने शेकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने जलसिंचन प्रकल्पात पाणी पातळी चिंताजनक आहे. हा जलसाठाही लवकर आटला जाईल. त्यामुळे खरीप व रब्बी दोन्ही हंगाम धोक्यात आले आहेत.
-जयसिंग ठाकरे, शेतकरी, पाडळपूर, ता.तळोदा
दरवर्षी ओव्हर फ्लो होणारा रोझवा प्रकल्प यंदा नाममात्र भरला आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ओसंडून वाहत होता. कमी पावसामुळे अगोदरच शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पुढील रब्बी हंगामही प्रकल्पात जलसाठा नसल्याने नुकसानदायक ठरू शकतो.
-शामसिंग पाडवी, शेतकरी, कोठार, ता.तळोदा