नंदुरबार : देशात महागाईने जोर पकडला असून घरगुती गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठ महिन्यात गॅस सिलिंडरचे दर १४३ रुपयांनी वाढले असून आगामी काळातही दर वाढत राहिल्यास नागरिकांना खर्चात कपात करावी लागणार आहे.
राज्यातील सर्वाधिक गॅस जोडण्या असलेला जिल्हा अशी कधीकाळी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सात वर्षात गॅस कनेक्शन हे अडीच लाखांच्या घरात पोहोचले आहेत. यातून मागणी वाढली आहे. पुरवठा होत असला तरी सातत्याने होणारी दरवाढ नागरिकांना अडचणीची ठरत आहे. यामुळे गृहिणी पर्याची व्यवस्थांचा आधार घेत स्वयंपाक करत असल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागात सिलिंडरच्या वाढत्या दरांमुळे सर्वाधिक चिंतेची स्थिती असून महिलांकडून पारंपरिक सरपण घेतच स्वयंपाक केला जात असल्याचे चित्र आहे.
एकीकडे घरगुती सिलिंडरचे दर वाढत असताना दुसरीकडे व्यावसायिक सिलिंडरचे दरही वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यात ७३ रूपयांनी दर वाढल्याचे सांगण्यात आले.
आजघडीस १९ किलोचे सिलिंडर १ हजार १०९ किंवा त्यापेक्षा अधिकच्या किंमतीत मिळत आहे. यामुळे व्यावसायिकांनी खाद्यपदार्थ तसेच विविध कार्यक्रमात स्वयंपाक करणाऱ्या केटरर्सकडूनही थाळीच्या दरांत वाढ केली गेली आहे.
सबसिडी बंद दरवाढ सुरूच
जिल्ह्यात सध्या वितरित होणारे सिलिंडर हे सबसिडीपेक्षा अधिक दराने असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे सिलिंडर खरेदी केल्यानंतरही त्यांच्या खात्यावर सबसिडी देण्यात आलेली नाही. परिणामी गोरगरिबांनी नाराजी व्यक्त केली होती.
दोन महिन्यातच सिलिंडरचे हे वाढले आहेत. दर महिन्यात किमान १० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दरवाढत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढल्याने व्यावसायिकही घरगुती सिलिंडरचा वापर करु लागले आहेत. परंतू हे सिलिंडरही वाढीव दराने मिळत असल्याने त्यांचे हाल सुरु आहेत.
किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना दरवाढीचा सर्वाधिक भुर्दंड बसला असल्याचे चित्र आहे.
गॅसची दरवाढ झाली असल्याने चिंता आहे. पतीचे वेतनही नियमित नाही. यातून सिलींडरच काटकसर करुन पुरवतो. शहरी भागात रहात असल्याने चूल पेटवू शकत नाही.
-शोभा जाधव, गृहिणी, नंदुरबार.
गॅसचे वाढते दर ही एक समस्या होऊन बसली आहे. दर वाढल्याची माहिती नसल्याने मग मागच्यापेक्षा अधिक पैसे टाकावे लागतात. चुल पेटवण्यासाठी लाकूड व स्टोव्हसाठी राॅकेल कुठून आणू.
-रेखा पाटील, गृहिणी, नंदुरबार.