शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथे महसूल विभाग तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना नवे ई-पीक पाहणी ॲपबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना ॲपची माहिती देण्यात आली. या वेळी मंडळ अधिकारी निकिता नायक, तलाठी स्मिता पाटील, कृषी सहायक वनसिंग खर्डे, सुलतानपूरचे तलाठी भीमसिंग गावीत, कोतवाल भारत नेवरे, पोलीस पाटील रवींद्र पवार, शेतकरी दिगंबर पाटील, प्रमोद पाटील, शंकर राजपूत, प्रवीण पाटील, निंबा कटारे आदी उपस्थित होते.
शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या नोंदणीच्या आधारावरच शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. पूर्वी ही नोंदणी तलाठ्यांकडून केली जायची. परंतु ग्रामीण भागात एकाच तलाठ्याकडे दोन ते तीन सजांचा कार्यभार असतो. त्यामुळे तलाठी कधी या साज्याला, तर कधी त्या साज्याला जायचे. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. बहुतेकदा पिकांची नोंद करताना चुकासुद्धा व्हायच्या. परंतु आता महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ई-पीक पाहणी हे मोबाईल अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाच शेतातील बांधावरून पीक नोंदणी करता येणार आहे. तसेच पिकांचे फोटोसुद्धा अपलोड करता येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे.
नुकसानभरपाई मिळणे सोयीचे
या अॅपद्वारे शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकांची नोंदणी स्वतःच करणार आहे. त्यामुळे पिकांची अचूक नोंदणी होणार आहे. परिणामी नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान भरपाई आणि पीक विमा मिळणे सोपे होणार आहे.
-मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, शहादा
शेतकऱ्यांना आता स्वत:च स्वत:च्या पीक पाहणीची नोंद करता येणार आहे. याकरिता ई-पीक पाहणी नावाचे एक ॲप विकसित केले असून ते मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यायचे आहे. अतिशय सोपे ॲप आहे. यावर आपली माहिती भरून नोंदणी केल्यावर एक संकेतांक प्राप्त होईल. त्यानंतर आपल्या शेतावर जाऊन पिकांच्या फोटोसह क्षेत्र, पिकाचे नाव, सिंचन पद्धती आदी माहिती भरून साठवायची आहे. एका नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून २० खातेदारांची पिक पाहणी नोंदवता येईल. त्यामुळे स्मार्ट फोन नसल्यास चिंतेचे कारण नाही. कुठलीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या गावातील स्थानिक तलाठी, कृषी सहायक, कोतवाल यांच्याशी संपर्क साधायचा आहे. खरीप हंगामाची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असली तरी ३१ ऑगस्टपावेतोच आपली पीक पाहणी नोंदवावी. या माहितीचा उपयोग पीक विमा, नुकसान झाल्यास अनुदान वाटप अशा विविध शासकीय योजनांसाठी होणार आहे.