शहादा : नगरपालिकेने हजारो रुपये खर्चून तयार केलेल्या पादचारी मार्गावर छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्याने पालिकेचा हा खर्च वाया गेला आहे.शहादा नगरपालिकेने शासकीय विश्राम गृह ते बसस्थानकापर्यंतच्या गटारीवर पादचारी मार्ग तयार केला आहे. त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळून वाहणाऱ्या पाटचारीवरही मेनरोडला लागून पादचारी मार्ग बांधण्यात आला आहे. बसस्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असल्याने या भागात पादचारी मार्गाची अधीक गरज आहे. परंतु येथील पादचारी मार्गावर पालिकेनेच फिल्टर पाण्याचे केंद्र उभे केल्याने हा मार्गच बंद झाला आहे.या मार्गावर पूर्वीच्या अतिक्रमण धारकांनीदेखील अतिक्रमण केल्याने हा फुटपाथ असून नसल्या सारखा झाल्या झाला आहे. याच पादचारी मार्गावर पुढे व्यावसायिकांनी तर सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ खाजगी वाहनधारकांनी अतिक्रमण केल्याने हा पूर्ण मार्ग पादचाऱ्यांसाठी उपयोगी पडत नसल्याने पालिकेचा खर्च वाया गेला आहे. डोंगरगांवकडून येणाºया पाटचारीवरदेखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते भाजी मंडईतपर्यंत पादचारी मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावरही अनेक छोट्या व्यावसायिकांनी तसेच पादचारी मार्गावरील मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने या मार्गाचादेखील पादचारी मार्ग म्हणून उपयोग होत नाही.पालिकेने लाखो रुपये खर्चून दोन्ही पादचारी मार्ग तयार केलेले असून, नागरिकांना रहदारी टाळून सुरक्षित चालता यावे हा यामागचा उद्देश आहे. मात्र या दोन्ही मार्गांवर छोट्या व मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने पादचारी मार्गाचे अस्तित्वच संपले आहे. नागरिकांना नाईलाजास्तव मुख्य रस्त्याने वाहनांपासून बचाव करत व जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. या दोन्ही पादचारी मार्गावरील अतिक्रमण काढून पादचारी मार्ग मोकळे करण्याची नागरिकांची मागणी आहे.
शहाद्यात पादचारी मार्गावर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:13 IST