या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?
आघाडा : आघाडा ही रानभाजी असून तिची कोवळी पाने, बिया उपयुक्त ठरतात. ही वनस्पती भूक वाढवणारी, वात, हृदयरोग, मूळव्याध, मुतखडा, पोटदुखी, जलोदर, अपचन, आमांश, रक्तरोग, श्वासनलिका दाह इत्यादी रोग व विकारात उपयुक्त आहे. ही रानभाजी नेहमी सातपुड्यातील घनदाट जंगलात आढळते.
टाकळा : टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचा विकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो.
अळू : अळू ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील वनस्पती आहे. अळू हा बारमाही उगवणारा असून अळू ही एक औषधी वनस्पतीही मानली जाते. अळू थंड असल्याने ते वात, पित्त, कफनाशक असतात. तसेच अशक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात. अळूच्या पानांवर बेसन आणि इतर मसाले थापून पानाला उभी घडी घालून वाफेवर उकडतात. नंतर त्या पानाच्या वड्या पाडतात. या वड्यांना पात्रादेखील बोलले जाते.
करटोली : हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. कंदाचे चूर्ण व वंगभस्म मधुमेहात देतात. डोक्याचा त्रास, मुतखडा, सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारात कंदाचा वापर करतात. करटोलीचे भाजलेले कंद मूळव्याधीत रक्तस्राव थांबविण्यास आणि आतड्यांच्या तक्रारीत उपयोगी आहे. कंद कफोत्सर्जक आणि थंडी वाजून येणाऱ्या तापात उपयुक्त आहे.
शेवगा : शेवग्याच्या पानामध्ये अ, ब, क जीवनसत्त्वे तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, आयोडिन ही खनिजद्रव्ये, प्रथिने,तंतूमय पदार्थ हे मोठ्या प्रमाणात आढळतात. या भाजीमुळे पचन संस्थेचे विकार बरे होण्यास मदत होते. तसेच पानं, फुलं, फळं, बिया अशा सर्वच गोष्टी खाद्य म्हणून उपयोगात येतात.
या रानभाज्या झाल्या गायब
अंबाडी : सातपुड्याच्या दुर्गम भागात आढळणारी अंबाडी आता दुर्मिळ होत असून दिसेनाशी होत आहे. आंबट चवीची अंबाडीची भाजी ही चविष्ट तर असतेच शिवाय अनेक पोषकतत्त्वांनीही परिपूर्ण असते. अंबाड्याच्या भाजीत आयर्न (लोह), व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-६, कॅल्शियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट यासारखे अनेक पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
बांबूची रानभाजी : सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात मोठ्या प्रमाणावर बांबूची रानभाजी उपलब्ध राहायची. परंतु कालांतराने ही रानभाजी दुर्मिळ होत चालली असून काही प्रमाणात आढळून येते. या रानभाजीने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होऊन शरीर फिट राहते. तसेच मुतखडा, लघवी साफ होण्यास मदत होते.
शक्तिवर्धक रानभाज्या
बांबूची कोंब, शेवळाची कोंब, टोळंबीचे तेल, मोठी आंबाडी ही हळूहळू सातपुड्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या रानभाज्या गुणकारी असून याचा वापर आदिवासी बांधव दैनंदिन जीवनात करत होते. तसेच काही रानभाज्या ऋतूनुसार निघत असून याचा वापर आहारात मोठ्या प्रमाणावर केला जातो.
-सावन मोता वसावे, मोलगी, ता.अक्कलकुवा