लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प तयार करण्याचा मान नंदुरबार जिल्हा रुग्णालयाकडे कायम असताना आता तब्बल ३०० बेडला ऑक्सिजन पुरवेल अशा जंबो प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण ठरणार आहे. सद्या शासकीय दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असून, तिसरा शहादा येथे सुरू होत आहे. याशिवाय तळोदा येथेही प्रस्तावीत आहे.
सद्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्यमुळे व त्यांच्यातील ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने कृत्रिम ऑक्सिजन पुरविण्याच्या पद्धतीमुळे ऑक्सिजनची किंमत व त्याचे महत्त्व लोकांना पटले आहे. नैसर्गिकरीत्या आपल्या शरीरात ऑक्सिजन हवेतून मिळत असला तरी रुग्ण बेडवर असताना व त्याला फुप्फुसाची व्याधी असल्यावर कृत्रिमरीत्या त्याला रुग्णालयात ऑक्सिजन पुरविला जातो. सद्या कोरोना रुग्णांना फुफ्फुसाचे इन्फेक्शन झाल्यावर कृत्रिमरीत्या ऑक्सिजन पुरविला जातो. त्यामुळे ऑक्सिजन बेडची संख्या जिल्ह्यात अपुरी पडू लागली. जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातदेखील ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये २७८ ऑक्सिजन, तर ६० आयसीयू बेड आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये ३५९ ऑक्सिजन, तर १०० आयसीयू बेड आहेत. शासकीय रुग्णालयांना दररोज किमान ४०० जंबो सिलिंडर ऑक्सिजन लागतो. याशिवाय तेवढेच खासगी रुग्णालयांनाही लागतो. तो पुरवठा करण्यासाठी सद्या मोठी कसरत होत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प
उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाने हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्लांट तयार करण्याचा मान मिळविला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी अर्थात ऑगस्ट महिन्यात हा प्लांट तयार होऊन त्यातून दररोज १२५ जंबो सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती करण्यात येत होती.
दुसरी लाट आली आणि ती तीव्र होणार हे लक्षात येताच जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. रघुनाथ भोये यांनी मनावर घेऊन अवघ्या १५ दिवसांत दुसरा ऑक्सिजन प्लांट तयार केला. तोदेखील हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा असून, त्याची क्षमताही दिवसाला १२५ जंबो सिलिंडर ऑक्सिजन निर्मितीची आहे.
आता तिसरा प्रकल्प
जिल्हा रुग्णालय आवारातच आता तिसरा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा मात्र जंबो प्रकल्प राहणार आहे. एकाच वेळी ३०० बेडला ऑक्सिजन पुरविता येईल एवढी त्याची क्षमता आहे. अर्थात लिक्विड ऑक्सिजन आणून तो एक टँकमध्ये जमा करून त्याद्वारे ३०० बेडला ऑक्सिजन पुरविला जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामालाही सुरुवात झाली आहे. लवकरच तो पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहाद्यात मिनी प्रकल्प
शहादा येथे देखील ग्रामीण रुग्णालय आवारात ६० जंबो सिलिंडर दैनंदिन ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारला जात आहे. तोदेखील लवकरच कार्यान्वीत होणार आहे.
याशिवाय तळोद्यातही अशा प्रकारचा प्रकल्प उभारण्याचे सूतोवाच आमदार राजेश पाडवी यांनी केले आहे.
हे सर्व प्रकल्प सुरू झाल्यावर नंदुरबार जिल्हा भविष्यात मेडिकल ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या संख्येने ऑक्सिजन निर्मितीची शासकीय प्रकल्प असलेला नंदुरबार जिल्हा हा एकमेव ठरण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड हे डीपीडीसी व इतर माध्यमांतून निधी मिळवून काम तडीस नेत आहेत.