तळोदा : येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्र नसल्यामुळे सातपुड्यातील रुग्णांची अत्यंत गैरसोय होत असून, गंभीर रुग्णांना नाइलाजास्तव जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन या केंद्रासाठी ठोस प्रयत्न करावे. यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्र्यांना नागरिकांनी साकडे घातले होते. त्यांनी यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने तळोद्यात आल्या होत्या. त्यावेळी पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे यांच्यासमवेत सातपुड्यातील आदिवासी नागरिकांनी भेट घेऊन तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत त्यांना अवगत केले होते. त्यांना निवेदनदेखील देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तळोदा कुटीर रुग्णालयालाच सन २००४ मध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. तथापि, रुग्णालयात आजही रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कारण, अद्ययावत प्रयोगशाळा, एक्स रे, रक्त साठवणूक केंद्रे या प्रमुख बाबींची उणीव भासत असते. त्यामुळे रुग्णांना या सुविधांपासून उपेक्षित राहावे लागत असते. त्यासाठी नाइलाजास्तव बाहेर अधिक पैसे मोजावे लागत असतात. या सुविधांअभावी अत्यंत गंभीर रुग्णांनादेखील येथील आरोग्य प्रशासन सरळ जिल्हा रुग्णालय येथे पाठवावे लागत असते, अशावेळी काही रुग्णांना जीव गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक, तळोदा उपजिल्हा रुग्णालय हे तळोद्यासह अक्कलकुवा व धडगाव या तिन्ही तालुक्यांतील ग्रामीण भागातील आदिवासी जनतेच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. कारण, पुढील उपचारासाठी येथेच रुग्ण दाखल होत असतात. अशावेळी त्यांना येथे रक्त मिळत नाही. त्यांना आर्थिक भुर्दंड सोसून पुढे जावे लागत असते. येथे रक्त साठवणूक केंद्र उभारण्यात आले, तर सर्वांचीच गैरसोय दूर होईल.
या प्रकरणी आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु, राजकीय इच्छशक्तीच्या अभावामुळे कोणीही लक्ष घालायला तयार नाही. निदान तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या तीन तालुक्यांसाठी तरी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत साधनांसह रक्त साठवणूक केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी ग्रामीण जनतेने केली आहे.
रिक्त पदेही तातडीने भरावीत
तळोदा उपजिल्हा रुग्णालयात महत्त्वाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबतच रुग्णसेविका व इतर कर्मचाऱ्यांची पदे गेल्या अनेक वर्षंपासून रिक्तच आहेत. याकडे राज्य शासनाचा आरोग्य विभाग अगदी पाठपुरावा करूनही लक्ष घालत नसल्याचा आरोप आहे. स्पेशल वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना ती सेवा मिळत नाही. वास्तविक, या रुग्णालयात गोरगरीब रुग्णच उपचारासाठी येत असतात. परंतु, त्यांना आपल्या उपचारापासून वंचित राहावे लागत असते, अशी व्यथाही त्यांनी बोलून दाखवली आहे. आपण तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तळोदा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा गेल्या १५ वर्षांपासून प्राप्त झाला आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या बरीच असते. मात्र, येथे रक्त साठवण केंद्र नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. नाइलाजास्तव त्यांना बाहेर जावे लागते. त्यात पैसा व वेळ जातो. हे रुग्णालय अक्कलकुवा, धडगाव व तळोदा येथील रुग्णांसाठी मध्यवर्ती आहे. त्यामुळे येथे रक्तसाठवण केंद्र उभारण्यात यावे, तशी मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. - यशवंत ठाकरे, सभापती, पंचायत समिती तळोदा