असलोद व मंदाणे भागात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते. या भागातील हे प्रमुख पीक म्हणून त्याची ओळख आहे; परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कापूस पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कमी होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना कापूस पिकासाठी लागलेला खर्चही गेल्यावर्षी निघाला नाही. म्हणून यंदा पर्यायी पिकाचा शोध घेऊन कापसाच्या लागवडीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी मका, मूग, सोयाबीन, मिरची, पपई, ऊस, कांदा आदी पिकांची लागवड केली आहे. त्यातच यंदा सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण अतिअल्प असल्याने पेरण्या उशिरा झाल्या. त्यामुळे कापूस व इतर पिकांची वाढ खुंटली. त्यामुळे हंगामही उशिरा जाणार आहे. आता आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढला. या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, कापसाचे पीक वाया गेले आहे. पपई पिकाचेही बऱ्याच ठिकाणी नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. इतर पिकांनाही जास्त पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्याने नुकसान होत आहे. गेल्यावर्षी कापसाला जेमतेम पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने यंदा कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर उलट कर्जबाजारी होण्याची वेळ आली, अशी स्थिती आहे.
असलोद-मंदाणे भागात कापसाचे क्षेत्र घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:34 IST