मनोज शेलार
कोरोनामुक्त जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. सलग दोन दिवस रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात मोजक्याच जिल्ह्यात असलेला डेल्टा प्लसचा शिरकाव जिल्ह्यात आधीच झालेला आहे. आता येत्या काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह इतर विविध सण, उत्सवांची रेलचेल राहणार आहे. त्यात सहभागी होताना आवश्यक दक्षता पाळून ‘कोरोना’ पुन्हा वरचढ ठरणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात ३ ऑगस्टनंतर तब्बल १८ दिवसांनी कोरोना रुग्ण आढळून आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा दुसरा रुग्ण आढळून आला. याचा अर्थ जिल्ह्यात कोरोना अद्यापही सक्रिय आहेच हे सिद्ध होते. गेल्या दोन ते तीन आठवड्यांत साजरे झालेले विविध सण, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रम यामुळे कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शिवाय कोरोना कायमचाच गेला या अविर्भावात नागरिक राहू लागले. गर्दी करणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्सिंग न पाळणे, हात वारंवार स्वच्छ न करणे यासह कोरोनाच्या दक्षतेच्या इतर बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आणि व्हायचा तो परिणाम झालाच. शासन, प्रशासनाने विविध निर्बध शिथिल केले आहेत. त्याचा एकाप्रकारे दुरूपयोगच होत असल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. हॉटेल, खानावळ, बार, विविध वस्तू विक्रीची दुकाने या ठिकाणी शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक ठिकाणी शासन, प्रशासन, पोलीस लक्ष देऊ शकणार नाही हे खरेच आहे. परंतु नागरिकांनी स्वत:हून स्वयंशिस्त लावून घेतल्या तर कोरोनाला अटकाव करता येऊ शकणार आहे.
ज्या डेल्टा प्लसची भीती दाखविली जात आहे तो नंदुरबारात याआधीच शिरकाव करून गेलेला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात डेल्टाचा रुग्ण नंदुरबार जिल्ह्यात आढळला होता. अतिशय गोपनीय ठेवण्यात आलेली ही बाब शासनाच्या आकडेवारीतून बाहेर आलीच. सुदैवाने संबंधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील सर्व रुग्ण ठणठणीत बरे झालेले आहेत. त्यामुळे डेल्टाने नंतर जिल्ह्यात हातपाय पसरले नाहीत ही सुदैवाची बाब आहे. राज्यातील मोजक्याच जिल्ह्यात डेल्टाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यात नंदुरबारचाही समावेश असल्याने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे ठरणार आहे.
येत्या काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह इतर विविध सण, उत्सव साजरे होणार आहेत. अशा वेळी गर्दीवर नियंत्रण ठेवून सार्वजनिक उत्सवांवरील शासनाने घालून दिलेल्या मर्यादांचे पालन होणे आवश्यक आहे. केवळ श्रद्धा, धर्म आणि उत्सवांचा उन्माद ही आपलीच मक्तेदारी आहे असे काही संघटना, संस्थांची मानसिकता आहे. ती बदलणे अशावेळी क्रमप्राप्त आहे. कोरोनात ज्यांचे सर्वस्व गेले अशा कुटुंबांना, व्यक्तींना कशा मानसिकतेला, परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे त्याचे चित्र भयानक आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि गेल्या वेळची दुर्दैवी परिस्थिती येऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.
देश व राज्य सरकारे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व इतर विविध अहवाल हे तिसऱ्या लाटेचा इशारा देत आहेत. त्यासाठी ऑॅक्सिजनचा पुरेसा साठा, आवश्यक बेड तयार करण्याच्याही सूचना आहेच. जिल्ह्यात ऑक्सिजनबाबत ७० टक्के स्वयंपूर्णत: असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दुसरीकडे मात्र जिल्हा रुग्णालयासह तालुका पातळीवर असलेले कोविड केअर सेंटर बंद झाले आहेत. तेथील डॅाक्टर, कर्मचाऱ्यांना ‘नारळ’ देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनही काहीसे रिलॅक्स असल्याचे चित्र आहे. हा विरोधाभास दूर होणेही गरजेचे आहे.
एकूणच कोरोनाला सहजतेने घेण्याची चूक पुन्हा करू नका, अन्यथा दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट जिल्ह्यात अधिक वेदनादायी ठरेल आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.