वास्तविक जागा रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेणे आवश्यक असते. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया सुरू केली आहे. याआधीच निवडणुका याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला आरक्षणही काढण्यात आलेले आहे. आता केवळ निवडणुका घेण्याचेच बाकी आहे. त्यासाठीची घोषणा निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी केली आहे. २९ जून रोजी अधिकृत अध्यादेश निघाल्यानंतर त्याच दिवसापासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु निवडणुका होणार की नाही? या संभ्रमावस्थेत राजकीय पक्षांसह प्रशासन आणि जनतादेखील आहे.
असे असले तरी जिल्हा निवडणूक विभागाने या निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारीला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने काहीही निर्णय घेतला तरी प्रशासनाने तयारी व सज्जता कायम ठेवली आहे.
दुसरीकडे, राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. उमेदवारांच्या चाचपणीसह इतर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी दाखल करताना लागणारी कागदपत्रे तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या त्या गट व गणांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
जुलै महिना म्हणजे खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा महिना असतो. पेरण्यांसह निंदणी, कोळपणी, खते देणे, कीटकनाशकांची फवारणी करणे, आदी कामांत शेतकरी, शेतमजूर व्यस्त असतात. जुलै महिन्यातच जिल्ह्यात पावसाचा जोरदेखील अधिक असतो. अशा काळात प्रचार कसा करणार हा प्रश्न निर्माण होतो. शिवाय कोरोनाचा धोकादेखील अद्याप कमी झालेला नाही. अनेक निर्बंध कायम आहेत; त्यामुळेही निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे.