नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात सध्या लहान बालकांना मात्र किरकोळ आजारांनी घेरले आहे. वातावरणीय बदलांमुळे हे आजार वाढीस लागले असून यामुळे बालरोग तज्ज्ञांकडील ओपीडी सध्यातरी हाऊस फुल्ल अशीच आहे.
प्रामुख्याने लहान बालकांमध्ये सर्दी, खोकला, ताप यासह मलेरिया, टायफाॅईड, डेंग्यू आणि न्यूमोनियाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. व्हायरल फिवर असलेल्या या बालकांवर उपचार सुरु आहेत. औषधी वेळेवर घेतल्यास हे आजार बरे होत असल्याने नागरीकांनी वैद्यकीय सल्ला नियमित घेत, उपाययोजना कराव्यात असेही सांगण्यात येत आहे. गत १५ दिवसांपासून रुग्णालयांमध्ये लहान मुले आढळून येत असली तरी यातील एकासही कोरोनाची लागण झालेली नसल्याने भीतीचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात दरवर्षी डेंग्यूसदृश तापाचे तसेच मलेरियाचे रुग्ण नियमित आढळून येतात. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण समोर आले आहेत. त्यांच्या चाचण्या केल्यानंतर त्या निगेटिव्ह आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान मलेरिया व टायफाॅईडची लागण झालेल्या बालकांची अधिक संख्या असल्याने त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. चाचण्या केल्यानंतरच त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात येत आहे.
लहान बालकांमध्ये किरकोळ आजार दिसून येत असले तरी त्यांची कोरोना चाचणी करण्यावर मात्र भर देण्यात येत नाही.
लहान बालकांमध्ये कोरोनाची कोणतही लक्षणे आढळून येत नसल्याने त्यांच्या चाचण्या करणे तूर्तास तरी टाळले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात काही अंशी शारीरिक क्षमता कमी होते. यातून बालकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. पालकांनी योग्य ते उपाय केल्यास अडचण येणार नाही.
-डाॅ. के.डी.सातपुते,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.
किरकोळ आजारांची लागण होऊ नये, यासाठी नागरिकांनी घर आणि परिसरात स्वच्छता पाळली पाहिजे. बालकांचे लसीकरण वेळेत करुन घेतले पाहिजे. सध्या केवळ व्हायरल फिवरचे रुग्ण समोर येत आहेत. त्यांना योग्य उपचार केल्याने ते बरे होत आहेत.
-भूषण पाटील,
बालरोग तज्ञ, नंदुरबार.
गार पाणी आणि थंड वस्तू टाळव्यात, पाणी उकळून गार करून प्यावे, कोरडा दिवस पाळवा.
पाण्यावर डास बसणार नाही याची काळजी घ्यावी, पिण्याच्या पाण्याची भांडी झाकून ठेवावी.
मुलांना लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा, वैद्यकीय सल्लानुसार विश्रांती आवश्यक आहे.