लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या १२ ते १५ वर्षांपासून रखडलेल्या मेडीकल कॅालेजला अखेर मूहर्तू मिळाला. यंदापासून हे कॅालेज सुरू होत असून त्याअंतर्गत लागलीच केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रीया देखील सुरू होत आहे. १०० विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष एमबीबीएसला प्रवेश मिळणार आहे. यासाठी केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे. याबाबत खासदार डॅा.हिना गावीत व आमदार डॅा.विजयकुमार गावीत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. नंदुरबारला मेडीकल कॅालेजेची घोषणा २००८-०९मध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री डॅा.विजयकुमार गावीत यांनी केली होती. त्यानंतर तब्बल २०२० मध्ये प्रत्यक्षात कॅालेजचे स्वप्न साकार होत आहे. स्वप्नपूर्ती झाल्याचे समाधान होत असल्याचे आमदार डॅा.विजयकुमार गावीत यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना स्पष्ट केले. कॅालेजच्या मंजुरीविषयी माहिती देण्यासाठी खासदार डॅा.हिना गावीत व आमदार डॅा.विजयकुमार गावीत यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी डॅा.विजयकुमार गावीत म्हणाले, जिल्हा निर्मीतीनंतर आपण जे काही मोठ्या प्रोजेक्टचे स्वप्न पाहिले होते त्यातील मेडीकल कॅालेज हे एक होते. आघाडी शासनाच्या काळात मंत्री असतांना अनेक प्रोजेक्ट पुर्ण केले. परंतु मेडीकल कॅालेजला विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या. २०१२ मध्ये राज्य सरकारने नंदुरबारसह रायगड, सातारा आणि मुंबई परिसर अशा चार कॅालेजला मंजुरी दिली होती. त्यातील नंदुरबारचे कॅालेज आता सुरू होत आहे. येत्या काळात वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय प्रश्नासाठी जिल्ह्यातील जनतेला इतर ठिकाणी जावे लागू नये अशी व्यवस्था या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणखी काही प्रोजेक्ट आहेत ते येत्या काळात मंजुर होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सातत्याने पाठपुरावामुळे यशखासदार डॅा.हिना गावीत यांनी सांगितले, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण मेडीकल कॅालेज नंदुरबारला सुरू करणार अशी घोषणा केली होती. परंतु तांत्रीक अडचणी येत गेल्या. गेल्या वर्षभरापासून आपण दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच यंदा खास बाब म्हणून नंदुरबार आदिवासी जिल्ह्यातील कॅालेजला मंजुरी देण्यात आली. लागलीच केंद्राच्या हिस्स्याचे ६० टक्के अर्थात १९५ कोटी रुपये देखील मंजुर केले गेले. अंतीम त्रुटी पुर्ण करण्याचे आव्हान होते ते देखील पुर्ण केले. गेल्या महिन्यात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची समिती तीन दिवस येथे थांबून होती. समितीने सर्व बारकाईने पहाणी केली व यंदा कॅालेज सुरू होण्यास हरकत नाही असा अभिप्राय दिला. परंतु त्यानंतरही आपण पाठपुरावा सुरू ठेवला आणि यंदाच्या नीट परीक्षेच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रीया राबविली जावी यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला यश आले असून नुकतेच मंजुरीचे पत्र देखील केंद्रीय मंत्री डॅा.हर्ष वर्धन यांनी दिले आहे. पदभरतीला सुरुवातमंजुरी मिळण्याच्या आधी पुर्ण पदे भरल्याचे दाखवावे लागते. त्यासाठी प्रतिनियुक्तीवर पदभरती करण्यात आली. आता एकदाची मंजुरी मिळाली असल्याने लागलीच पदभरतीला सुरुवात होणार आहे. पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी सर्व आवश्यक साधन सामुग्री, पदे उपलब्ध आहेत. त्यामुळे अडचण येणार नाही. एकदाचे कॅालेज रुटीनमध्ये आले तर इतर प्रक्रीया हळूहळू वेग घेतील असेही त्यांनी सांगितले.डीन यांची मेहनतकॅालेजचे प्रभारी डीन डॅा.शिवाजी सुक्रे यांनी देखील मोठी मेहनत घेतली. त्रुटी पुर्ण करणे, कॅालेजसाठी आवश्यक बाबींची उपलब्धता करून घेणे, एनएमसीच्या समितीसमोर योग्य प्रेझेंटेशन करणे यासह इतर बाबी डॅा.सुक्रे यांनी वेळोवेळी केल्याने देखील कॅालेज मंजुरीच्या प्रक्रीयेला हातभार लागल्याचे खासदार डॅा.हिना गावीत यांनी सांगितले.
पाच वर्षात इमारती उभ्या राहणार...कॅालेजला मिळालेल्या टोकरतलाव शिवारातील जागेवर येत्या पाच वर्षात आवश्यक इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी ३२५ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. त्यातील ६० टक्के अर्थात १९५ कोटी रुपयांचा हिस्सा हा केंद्र शासनाने मंजुर केला आहे. राज्याचा ४० टक्के अर्थात १३० कोटी रुपयांचा निधी लवकरच अर्थसंकल्पीत करावा लागणार आहे. सिव्हील हॅास्पीटलची हस्तांतराची प्रक्रीया यापुर्वीच पुर्ण झाली आहे. आता मेडीकल कॅालेज सुरू होताच स्थानिक हस्तांतरणाची प्रक्रीया राबविली जाणार आहे. त्याअंतर्गत ओपीडी व इतर बाबी या मेडीकल कॅालेजच्या अंतर्गत येणार आहेत.