नांदेड जिल्ह्यातून तब्बल १९ हजार ५५० विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली आहे. त्यात तामिळनाडू सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, राज्य पातळीवर परीक्षा घेणे अथवा बारावी गुणांवर मेडिकलला प्रवेश देणे चुकीचेच ठरेल, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
परीक्षेची गुणवत्ता पाहता व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची परीक्षेबद्दलची विश्वासार्हता कायम राहील.
नीटशिवाय मेडिकल प्रवेश सुरू केल्यास, गुणवत्ता असलेले डॉक्टर घडणे कठीण होईल. ‘वन नेशन वन एक्झाम’ हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून प्रांतिक परीक्षांमध्ये होणारे घोटाळे, विलंब, गैरसोय दूर करण्यासाठी नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) ही परीक्षा सुरू करण्यात आली होती. नीट परीक्षेसाठी दरवर्षी लाखो
विद्यार्थी बसतात. परंतु, या परीक्षेतही घोटाळे, पेपरफुटीसारखी प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे यावर ठोस पाऊल उचलून परीक्षा व्यवस्थापन सुधारण्यावर भर द्यावा, जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांचे मनोबल स्थिर होईल आणि एनटीए वरचा विश्वास कायम राहण्यास मदत होईल, असे मत आयआयबीचे संचालक दशरथ पाटील यांनी व्यक्त केले.
चाैकट...
कोणतीही परीक्षा ही परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी असते. ‘वन नेशन वन एक्झाम’ तत्त्वावर आधारित नीट परीक्षेसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. त्यातून देशभरात जवळपास ७० हजार विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ही परीक्षा असून, एनटीएकडून दरवर्षी ही परीक्षा घेते. बारावीवर परीक्षा घेतली तर देशाला गुणवत्तापूर्ण डॉक्टर मिळणार नाहीत. - दशरथ पाटील, नांदेड.
देशातील काही ठराविक परीक्षा देशपातळीवर घेतल्या जातात. त्यातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निवड होते. त्याच धर्तीवर नीट असून वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. ती टाळून बारावीच्या आधारावर मेडिकल प्रवेश देणे चुकीचे आणि देशासाठी, आरोग्य विभागासाठी धोक्याचे ठरेल. - गजानन मोरे, शैक्षणिक सल्लागार, नांदेड.
चौकट...
बारावीच्या गुणांवर मेडिकलला प्रवेश दिल्यास गुणवत्तापूर्ण डॉक्टर निर्माण होणार नाहीत. परीक्षा राज्यपातळीवर घेण्याऐवजी पेपरफुटी, वेळेवर परीक्षा न होणे, विद्यार्थ्यांनी निवडलेले सेंटर सोडून इतर सेंटर देणे आदी बाबींवर लक्ष केंद्रित करून व्यवस्थापन सुधारण्यावर भर द्यावा. -निकिता गावंडे, विद्यार्थिनी.
बारावी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेणे सोपे आहे. त्यात ग्रामीण भागात अथवा ज्या सेंटरवर कॉप्या चालतात, त्या ठिकाणी घेतले तर मग अपेक्षित मार्क मिळणे सोईचे होते. त्यात बहुतांश संस्था राजकीय पुढाऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे बारावीच्या गुणांवर मेडिकलला प्रवेश देऊ नये. नीट हाच फाॅर्म्युला ठेवावा. - वैष्णवी पगारे, विद्यार्थिनी.