नागपूर : नागपूर जिल्ह्यात रब्बीसोबतच खरीप हंगामात प्रति हेक्टर उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा खरीप आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील आमदारांसह जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू उपस्थित होते. बैठकीत २०१४-१५ या वर्षाचा कृषी उत्पादनाचा आढावा आणि २०१५-१६ च्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. उत्पादकता कशी वाढविता येईल, यावर चर्चा करण्यात आली व उपाययोजनाही सुचविण्यात आल्या. महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांमध्ये कृषी उत्पादकतेचा दर अधिक आहे. त्याचा अभ्यास करून जिल्ह्यातील कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करा, तालुका कृषी अधिकार व कृषी सहायकांनी सूक्ष्म नियोजन करून सोमवारपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे आराखडे सादर करावे आणि १५ मेपासून त्यावर काम सुरू करावे, असे बावनकुळे यांनी सांगितले.आराखडे तयार करताना ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, त्यांना जलयुक्त शिवारसह शासनाच्या इतर योजनांची माहिती द्यावी आणि पेरणी पद्धत समजावून सांगावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदारी देण्यात आली असून, कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. बैठकीला खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, आशिष देशमुख, सुधीर पारवे, समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. मिलिंद माने, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, कृषी सभापती आशा गायकवाड, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजी जोंधळे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. विजय घावटे आणि जिल्हा कृषी अधिकारी सुबोध मोहरील उपस्थित होते. (प्रतिनिधी) तीन महिन्यात देणार ३५२४ वीज जोडण्याखरीप हंगामात सिंचनाची सोय व्हावी म्हणून तीन ते चार महिन्यात ३५२४ वीज जोडण्याचे वाटप करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. वीज जोडण्यांसाठी प्रलंबित असलेल्या अर्जांचा निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.मुख्यमंत्री करणार अकस्मात पाहणीखरीप हंगामादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते आकस्मिकपणे काही गावांना भेटी देणार असून तेथील पिकांची पाहणी करतील. या भेटी दरम्यान कृषी सहायक, कृषी अधिकारी, तलाठी अनुपस्थित आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाईबोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिले. दरवर्षी जिल्ह्यात काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. याबाबत कृषी खाते आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे व विक्रेत्यांवर कारवाई करावी. बोगस बियाणांचे प्रकार उघडकीस आल्यास अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यंदा कृषी उत्पादकता वाढीवर भर
By admin | Updated: May 3, 2015 02:07 IST