नागपूर : राज्यातील काही जिल्ह्यात मार्च महिन्याचे तर बहुतांश जिल्ह्यात एप्रिल महिन्याचे शिक्षकांचे वेतन अजूनही झाले नाही. शिक्षकांच्या वेतनासाठी शासन निधी मंजूर करणार की नाही? असा सवाल शिक्षक संघटनांनी शासनाला केला आहे.
कोरोना योद्धे म्हणून राज्यातील हजारो शिक्षक काम करीत असून त्यांच्याच वेतनाचा निधी अद्याप मंजूर होत नसल्याने राज्यभरातील शिक्षक-शिक्षकेतरांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. शिक्षकांना वेतन देण्यासाठी निधीच शिल्लक नसल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे वेतनही शिक्षकांना मिळाले नाही. याबाबत भाजपा शिक्षक आघाडीने मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्तांना पत्र दिले असून त्यात तातडीने वर्षभराचा निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. राज्यातील अनेक शिक्षक कोरोना प्रतिबंधक काम करीत असून त्यात अनेक शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून अनेक शिक्षक पॉझिटिव्ह असल्याने कोरोनामुळे वरील औषधोपचार, बँकांचे थकलेले हप्ते,विमा हप्ते, त्यावर आकारलेला दंड यामुळे शिक्षक आधीच त्रस्त आहे. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संघटनेचे डॉ. कल्पना पांडे, डॉ. उल्हास फडके, अनिल शिवणकर, अजय बिडकर, प्रदीप बिबटे आदींनी केली आहे.
- लवकरात लवकर वेतन अदा करावे
१ तारखेला वेतन देण्याचे स्पष्ट निर्देश असताना बऱ्याच शाळांचे वेतन अजूनही झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. शिक्षकांचे वेतन लवकरात लवकर करण्यासंदर्भात योग्य कारवाई करावी. बंद असलेली बीडीएस प्रणाली सुरू करावी. कोषागार कार्यालय अनुदान वितरणाची शाईची प्रत प्राप्त झाल्याशिवाय देयके मंजूर करीत नाही. त्यासंदर्भाने तत्काळ निर्णय घेऊन देयके मंजूर करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केली आहे.