बालकामगारांप्रति शासकीय यंत्रणाच उदासीन : अहोरात्र जुंपले जाते कामाला मंगेश व्यवहारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खेळण्या बागडण्याच्या वयातला अमित मूळचा छत्तीसगडचा, नागपूरच्या रेस्टॉरेंटमध्ये काम करताना आढळला. कारण घरी सहा भावंडे व दोन बहिणी, वडील दारूडे. त्याच्याच वयाचा हमीद मूळचा बिहारचा नागपूरला नातेवाईकांबरोबर आला. तो दिवसाचे १५ तास साडीवर जरीवर्कचे काम करतो. याहीपेक्षा वेगळे म्हणजे रशीद वय १३ वर्षे, मूळचा उत्तर प्रदेशचा. वडील काम करीत असलेल्या कंपनीमध्ये चोरी केली व उत्तर प्रदेशात पळ काढला. मालकाने नुकसानभरपाईच्या नावावर रशीदला वेठबिगार म्हणून अहोरात्र कामास जुंपले. तसेच सुमती वय १६ वर्षे मूळची ओडिशा, गेल्या सहा वर्षांपासून घरकाम करायला रजिस्टर्ड एजन्सीमार्फत वेगवेगळ्या राज्यात तिला पाठविल्या जाते. ज्यात वय १९ वर्षे नमुद केलेले असते, कारण आई-वडील गरीब, व्यसनी व त्यांच्या गावातील सर्व मुली हेच काम करतात म्हणून तिच्याही वाट्याला तेच काम यावे, यात कुठे लैंगिक छळ झालाही तर ते सांगायचे कुणाला? ही सर्व मुले बालमजुरी निर्मूलनासाठी काम करणाऱ्या चाईल्ड लाईन व इंडियन सेंटर फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट या संस्थेला आढळलेली आहेत. शहरात अनेक ठिकाणी चहाच्या टपऱ्यांवर, ढाब्यावर, सोनार ओळीत, किराणा ओळीत, भांडेवाडीत कचरा वेचताना, अगरबत्ती उद्योग, वरातीसमोर दिवे घेऊन जाणे, पतंग व्यवसाय, पूजेचे नारळ तयार करणे, झालर व दरवाजाचे तोरण तयार करणे, काचपत्रे, शिशा, लोखंड गोळा करणे अन्य बाजारहाट ठिकाणी नजर फिरवली तर कित्येक छोटू, पिंटू इत्यादी नावाने ओळखले जाणारे बालमजूर आपणास मिळतील. मालकांना प्रश्न केला तर उत्तर ‘इनके भरोसे इनका घर चलता है, क्या आप पुरा करेंगे इसका घर!’ पालकांचा सूर काही वेगळाच ‘दिनभर घुमता, टवाळक्या करता, घर में दो पैसे आते और मालक के आँखो के सामने रहता है’ हे वास्तव आहे. बालमजुरीला घरातूनच प्रोत्साहन मिळत असल्याने त्याचे निर्मूलन कठीण जात आहे. निव्वळ कायदा करून हा प्रश्न सुटणार नाही तर बालकांच्या संदर्भात काम करणाऱ्या यंत्रणांनी हा विषय गांभीर्याने हाताळणे गरजेचे आहे.
कायदे आहेत,अंमलबजावणीचे काय?
By admin | Updated: June 12, 2017 02:30 IST