विजेअभावी पंप हाऊस बंद : कसे होणार सिंचन? नागपूर : धरणात पाणी नाही म्हणून सिंचन नाही किंवा कालवे झाले नाही म्हणून शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही, अशी सामान्यत: ओरड होत असते. परंतु धरणात पाणी पुरेसे असतांना आणि एका कालव्याचे काम पूर्ण झाले असूनही केवळ वीज नाही म्हणून गेल्या नऊ महिन्यांपासून धरणातील पाणी धरणातच अडून आहे. वीज नसल्याने पंप हाऊसचे काम बंद असल्याने ते शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचलेच नाही, असा आगळावेगळा प्रकार रामटेक तालुक्यातील सत्रापूर उपसा सिंचन योजनेत घडला आहे. यासोबत प्रकल्पातील बहुतेक कामे अजूनही रखडलेली आहेत, त्यामुळे सिंचन होणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.विदर्भ सिंचन शोधयात्रेंतर्गत रविवारी सत्रापूर उपसा सिंचन प्रकल्पाला भेट देण्यात आली. हा प्रकल्प गोदावरी खोऱ्यातील पेंच नदीवर नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील पेंच नवेगाव खैरी जलाशयाच्या बुडित क्षेत्रातील डाव्या बाजूस प्रस्तावित आहे. या जलाशयातील उपलब्ध पाणी साठ्यातील १६.५८५ दलघमी पाणी उपसा पद्धतीने उचल करून १२०० मीमी व्यासाचे उर्ध्वनलिकेच्या माध्यमातून सत्रापूर गावाजवळीत वितरण कुंडातून पुढे डावा व उजवा कालवा प्रणालीद्वारे सिंचन प्रस्तावित आहे. या योजनेद्वारे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील २६ गावातील २६२० हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे. अप्रत्यक्ष सिंचन त्याच्या दुप्पट आहे. परंतु सध्या केवळ ५०० हेक्टर क्षेत्रच प्रत्यक्ष सिंचनाखाली आले आहे. अनेक कामे अजूनही रखडलेली असल्याने अनेक शेतकऱ्यांना अजूनही सिंचनाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)वीज बिल थकले, पंप हाऊसचे कनेक्शन कटले सत्रापूर ही उपसा जल सिंचन योजना असल्याने येथे पंप हाऊसची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे. परंतु विजेअभावी पंप हाऊसही बंद आहे. सहा लाखाचे वीज बिल थकीत असल्याने वीज कंपनीने नऊ महिन्यांपूर्वी पंप हाऊसचे वीज कनेक्शन कापले आहे. सहा लाख रुपयाचे वीज बिल आहे. शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नसल्याने वीज कनेक्शन कापण्यात आल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी आपले हात झटकले आहे.पाण्याअभावी गेल्या वर्षीचे पीक बुडाले या प्रकल्पातील उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. मागणीनुसार त्यातून पाणी सोडले जाते. वीज बिल थकीत असल्यामुळे गेल्या वर्षी २३ आॅक्टोबर २०१४ रोजी पंप हाऊसचे वीज कनेक्शन कापण्यात आले. त्यामुळे कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले नाही. वीज कनेक्शन कापल्याने आम्ही पाणी सोडणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची लागवड करू नये, अशी जाहीर सूचना वर्तमानपत्रांतून दिली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी सुद्धा ही बाब मान्य केली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. लागवड न करण्याबाबत वेळेवर माहिती मिळाली. तेव्हापर्यंत पेरणी झाली होती. पाणी मिळणार नाही, याची शेतकऱ्यांना अपेक्षा नव्हती. त्यामुळे उभी पिके पाण्याअभावी बुडाल्याचे येथील शेतकरी मुकुंदा मेश्राम, पे्रमलाल धुर्वे, सय्यद मुजफ्फर हुसैन, रामू राऊत, विठ्ठल जांभुळे यांनी सांगितले. ४० हेक्टर भूसंपादनाची गरज या प्रकल्पा अंतर्गत पंपगृह, फोर बे, उर्ध्वनलिका व पोचरस्ता, वितरण कुंड, उजवा मुख्य कालवा आणि सत्रापूर रिव्हर्स कालव्याची कामे पूर्ण झाली आहेत. डाव्या मुख्य कालव्याचे आणि उप कालवे व पाटचऱ्यांची कामे अजून शिल्लक आहेत. डाव्या कालव्याच्या व उपकालव्यांच्या कामासाठी आणखी ४० हेक्टर जागेच्या भूसंपादनाची आवश्यकता आहे. यापैकी ३४ हेक्टर जागा शेतकऱ्यांकडून भूसंपादित करावयाची आहे तर ५.४२ हेक्टर जागा वन विभागाची आहे. वन विभागाने मंजुरी दिली असली तरी एका वन अधिकाऱ्याने ती जागा अडवून ठेवली असल्याची बाब पुढे आली आहे. ३८ कोटीचा प्रकल्प ११३ कोटीवर पोहोचला या प्रकल्पाची मूळ किम्मत ३८.७८ कोटी इतकी होती. १५ आॅक्टोबर २००१ साली त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली. २००७ पासून कामाला सुरुवात झाली.य १२ जानेवारी २०११ साली ७०.७९ कोटी रुपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अजूनही काम पूर्ण झाले नाही. या प्रकल्पावर मार्च २०१५ पर्यंत ७०.६२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. अजूनही बरीच कामे शिल्लक आहेत. उर्वरित कामांसाठी अजून ४३.२० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. े विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातर्फे २०१३-१४ मध्ये ११३ कोटी रुपयांची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावित करण्यात आली आहे. ...तर वर्षभरात प्रकल्प पूर्ण सध्या या प्रकल्पाचे काम जमिनीचे भूसंपादन, निधी आणि वन जमीन या तीन कारणामुळे अडून आहे. ही तिन्ही कामे तातडीने पूर्ण झाली. शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली तर संपूर्ण प्रकल्प जून २०१६ पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास सत्रापूर उपसा सिंचन योजनेचे सहायक अभियंता श्रेणी-१, एस.आर. मंडावार, सहायक अभियंता श्रेणी -२ नरेंद्र निमजे, शाखा अभियंता नीरज तुलसीनंदन यांनी व्यक्त केला. प्रकल्पाला मेन्टेनन्सची आवश्यकताप्रकल्पाचे काम बहुतांश पूर्ण झाल्याचे दिसून येत असले तरी कामाच्या दर्जबाबत मात्र साशंकता आहे. कालवे फार काळ टिकणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कालव्यांना सिमेंट भिंतीसह एकूणच प्रकल्पासाठी मेंटेनन्सची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची गरज आहे. तसेच या प्रकल्पात शेतकऱ्यांवर विजेचा सर्वाधिक भार पडत आहे. त्यांना विजेचे बिल भरणे शक्य नाही, असे असतांनाही प्रकल्प पूर्ण झाला तरी तो शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल, याबाबत संशय आहे. त्यामुळे यादृष्टीने शासनाने विचार करावा, अशी अपेक्षा जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी केली. याप्रसंगी जनमंचचे हसमुख पटेल, प्रवीण महाजन, प्रकाश इटनकर, राहुल जडे, राम आखरे, लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीचे संयोजक अॅड. अविनाश काळे, वेदतर्फे प्रदीप माहेश्वरी, नितीन रोंगे, राहुल उपगन्लावार, नवीन मालेवार, भारतीय किसान संघाचे शिवाजीराव खळतकर, नाना आखरे, रामराव घोंगे, दिलीप ठाकरे, अजय बोंद्रे, गणेश जवंजाळ, स्वदेशी जागरण मंचचे रवी गाडे उपस्थित होते.
धरणात पाणी; कालवे कोरडे
By admin | Updated: July 13, 2015 02:44 IST