ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 03 - गोल्ड लोनच्या नावाखाली दोन लाख रुपये घेऊन एका आरोपीने खासगी कंपनीच्या शाखा व्यवस्थापकाच्या हातात बनावट सोन्याचे दागिने ठेवले. ही बनवाबनवी धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आलोक पांडे (रा. रामबाग कॉलनी, इमामवाडा) असे आरोपीचे नाव आहे.
राहुल विलासराव खापेकर (वय ३२, रा. प्राची अपार्टमेंट, इमामवाडा) हे इंडीया इंन्फो लाईन हायमन्स लि. या कंपनीत अजनी शाखा प्रमूख म्हणून कार्यरत आहे. ही कंपनी कर्ज उपलब्ध करून देते. काही दिवसांपूर्वी खापेकर त्यांच्या कंपनीचे गोकुळपेठेत मार्केटींग करीत असताना आरोपी पांडे त्यांना भेटला. आपण मणप्पुरम गोल्डमधून ८ लाखांचे कर्ज घेतले आहे. हे कर्ज तुमच्या कंपनीत वळते करायचे आहे, असे आरोपीने सांगितले. विश्वास बसावा म्हणून आरोपी पांडेने खापेकरांना २ लाख, ३४ हजार तसेच ९० हजार कर्ज परत केल्याच्या दोन पावत्याही दाखवल्या. त्यानंतर माझ्याकडे २ लाख ३४ हजारांचे सोन्याचे दागिने आहे. त्यावर तुमच्या कंपनीतून २ लाखांचे कर्ज हवे आहे, असे सांगून आरोपी निघून गेला. २७ फेब्रुवारीला दुपारी २ वाजताच्या सुमारास खापेकर यांनी आरोपी पांडेला फोन करून २ लाखांची व्यवस्था झाल्याचे सांगून अजनी शाखेत बोलविले. तेथे खापेकर यांनी आरोपी पांडेला २ लाख रुपये दिले. बदल्यात पांडेने खापेकरच्या हातात दागिने ठेवले.
फिर्यादी उभे राहिले, आरोपी निघून गेला
हा व्यवहार झाल्यानंतर आधार कार्ड अन् विजेचे बील पाहिजे, असे खापेकरने सांगितले . घरून देतो, असे सांगून पांडेने खापेकर यांना रामबागमधील एका फर्निचरच्या दुकानाजवळ नेले. तेथे त्यांना उभे ठेवून कागदपत्रे घेऊन येतो, असे म्हटले. खापेकर तब्बल दोन तास उभे राहिले. मात्र, आरोपी परत आला नाही. त्याने दिलेल्या पत्त्यावर आणि परिसरात चौकशी केली असता, आलोक पांडे नावाचा इसमच राहत नाही, असे नागरिकांनी सांगितले. हादरलेल्या खापेकरने दागिने तपासले असता ते सोन्याचे नव्हे तर दुस-या पिवळळ्या धातूचे (बनावट) असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खापेकर यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी करून फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. कथित आलोक पांडेचा शोध घेतला जात आहे.