नरेश डोंगरे । नागपूरराज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सध्या सर्वत्र एकाच प्रश्नाची चर्चा आहे. तो प्रश्न म्हणजे, कुछ मेसेज है क्या? जवळपास रोजच हा प्रश्न अनेक अधिकारी आपापल्या बॅचमेटस्ना विचारत आहे. रखडलेल्या बदल्यांमुळे अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, याच अस्वस्थतेतून रोज हा प्रश्न विचारला जात आहे. पाच-सात वर्षांपूर्वीपर्यंत मार्च महिन्याच्या प्रारंभापासून पोलीस दलात बदल्यांचे वारे वाहायला सुरुवात होत होती. फायनली ३१ मेच्या आत गृहविभागातर्फे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी जाहीर केली जायची. काही वर्षांपासून बदल्यांचे ठिकाण आणि वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावावर (एसपी/ डीसीपी) शीर्षस्थ पोलीस अधिकारी आणि नेत्यांमधील मतभिन्नता वाढीस लागली. त्यामुळे बदलीसाठी ‘ट्रान्सफर अॅक्ट’च्या तरतुदीचा वापर होऊ लागला. त्यानुसार, दरवर्षी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ३१ मेपर्यंत बदल्या झाल्या नाही तर विशेष बाब म्हणून कॅबिनेटची मंजुरी घेऊन पुढे (३१ मेनंतर) १५ दिवसांच्या आत या बदल्यांची यादी जाहीर करावी लागायची. मात्र, दोन वर्षांपासून त्यालाही छेद बसला. विशिष्ट अधिकाऱ्यांसाठी लॉबिंग झाल्यामुळे २०१२ ला बदल्यांचा मोठाच घोळ झाला. परिणामी २०१२ मध्ये १३ जूनला बदल्यांची यादी जाहीर झाली. गेल्या वर्षी तर अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्याच झाल्या नाहीत. त्यात नागपूरच्याही ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. अर्थात गेल्या वर्षी ट्रान्सफर अॅक्टची मुदतदेखील गुंडाळली गेली. अध्यादेश निघाले अन् वरिष्ठ सूत्रांच्या मते अधिकाऱ्यांची कुचंबणा टाळण्यासाठी फेब्रुवारी २०१४ मध्ये एक अध्यादेश काढण्यात आला. त्यानुसार, एका ठिकाणी दोन वर्षे कार्य करणाऱ्या एसपी/ डीसीपी आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असे त्यात नमूद होते. मात्र, त्याला मंजुरीच मिळाली नाही. त्यानंतर दुसरा असाच अध्यादेश एप्रिल २०१४ ला निघाला. त्यालाही मंजुरी मिळाली नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे आदेश आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र, त्यात तीन वर्षांचा कालावधी गृहित धरण्यात आला.यामुळे तीन वर्षांला काही दिवस कमी असल्याने अनेक अधिकारी आहे तेथेच राहिले. त्यांच्या बदल्या निवडणुका आटोपल्यानंतर लगेच केल्या जातील, असे अपेक्षित होते. मात्र, निवडणुकांचा निकाल लागून आता महिना झाला तरीसुद्धा एसपी/डीसीपी आणि त्याउपर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाही. त्यामुळे राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अक्षरश: उद्विग्न झाले आहेत. त्यातील अनेक जण रोजच एकमेकांना प्रश्न विचारत आहे, कुछ मेसेज है क्या ?
बदल्यांचा भुलभुलय्या : वरिष्ठ अधिकाऱ्यात अस्वस्थता - कुछ मेसेज है क्या ?
By admin | Updated: June 21, 2014 02:38 IST