नागपूर : प्रतिबंधित तंबाखू आणि गुटख्याचा विदर्भात पुरवठा करणाऱ्या तस्करांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, यांचा म्होरक्या डब्बा प्रकरणात सहभागी असलेला अभिषेक बजाज आणि त्याचा भाचा अंकित मालू हे फरार झाले आहेत.
अटकेतील आरोपींमध्ये स्नेहल जगदीश विटनकर, अतुल दिलीप शेंडे, जुबेर इस्माइल शेख यांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिषेक आणि अंकित गाजलेल्या डब्बा प्रकरणात सहभागी होते. काही काळापासून ते तंबाखू आणि गुटख्याचा व्यावसाय करायचे. बालाघाटमधून प्रतिबंधित तंबाखू आणि गुटखा आणून विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पुरवठा करीत होते. वाठोडा आणि परिसरात त्यांनी माल ठेवण्यासाठी पाच ते सहा गोदाम भाड्याने घेतले होते. अभिषेक याने अनमोलनगरातील घराजवळ स्नेहलच्या माध्यमातून धावडे यांचे घर गोदामासाठी भाड्याने घेतले होते. शनिवार सकाळी दोन वाहनांमधून मजा आणि ईगल ब्रांडचा तंबाखु गोदामात ठेवला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी धाड घालून स्नेहल, अतुल आणि जुबेर यांना रंगेहात पकडले. वाहनात मजा आणि ईगल ब्रांड तंबाखूच्या १३६ बॅग मिळाल्या. आपण अभिषेक बजाज आणि अंकित मालू यांच्याकडे मॅनेजर असल्याने स्नेहलने सांगितले. पोलिसांनी या दोघांचा शोध घेतला. मात्र, ते पसार झाले.
आरोपींनी अन्य गोदामांमध्ये सुमारे एक कोटी रुपयांचा तंबाखू आणि गुटखा लपविल्याची माहिती आहे. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय तलवारे, एपीआय चौधरी तांबे आणि त्यांच्या पथकाने केली.