निषादचे आयोजन : गायक किशोरदांना स्वरांजली नागपूर : हिंदी रुपेरी पडद्यावरील हरहुन्नरी कलावंत म्हणजे किशोरकुमार. किशोरदांच्या जयंतीनिमित्त निषाद संगीत संस्थेतर्फे त्यांना त्यांच्याच लोकप्रिय गीतांची स्वरांजली वाहण्यात आली. या गायकाचे अवघे जीवनगाणेच स्वरानंदाच्या मस्तीत डुंबलेले आणि इतरांचेही भावविश्व श्रीमंत करणारे होते. किशोरदांची आठवण करताना शिशिर पारखी, रंजिता इंदूरकर, अनुजा मेंघळ, अंकिता टकले, दीपक मोसरकर, ज्ञानेश पाव्हणे व सतीश या नव्या - जुन्या कलावंतांनी सादर केलेल्या या गीतांच्या कार्यक्रमात रसिक गुंतले. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात सादर करण्यात आला. शिशिर पारखी यांच्या ताज्या टवटवीत स्वरातील अजनबी सिनेमातील ‘भिगी भिगी रातो मे...’ या गीतासह कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यानंतर त्यांनी ‘करवटे बदलते रहे.., वादा करो नही छोडोगे मेरा हाथ.., गाता रहे मेरा दिल...’ आदी गीतांचे सुश्राव्य सादरीकरण रंजितासह केले. अनुजासह ‘आसमा के निचे.., क्या यही प्यार है...’ आदी त्यांची रोमांचक युगुल गीतेही रसिकांना पसंत आलीत. सतीश - रंजिता यांनी ‘आपकी आँखो मे...’ आणि अंकितासह ‘कोरा कागज था ये मन मेरा..’ आदी गीतांनी रसिकांची दाद घेतली. दीपकने तयारीने सादर केलेल्या ‘ओ मेरी सोनी..मेरी तमन्ना.., जाने कैसे कब हुआ इकरार हो गया...जलता है जिया मेरा भिगी भिगी रातो मे...’ आदी युगुलगीतांनी खास माहोल केला. गायक ज्ञानेश पाहुणे यांच्या मस्तीभऱ्या स्वरातील अंकिता समवेतच्या ‘अरे यार मेरी तुम भी गजब हो..., छेडो ना मेरी जुल्फे...’ आदी गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. याशिवाय ‘सागर किनारे..., इस मोड से जाते है...’ आदी एकूण २३ गीते या कार्यक्रमात सादर करण्यात आली. प्रत्येकच गीताला श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. स्थानिक वादक कलावंतांनी या कार्यक्रमात योग्य साथसंगत केली.यात अशोक टोकलवार, सुभाष वानखेडे, उज्ज्वला गोकर्ण, रघुनंदन परसतवार, रिंकु निखारे, प्रसन्न वानखेडे, अरविंद उपाध्ये, महेंद्र ढोले, श्रीराम वाघ, श्रीरंग भावे हे वादक कलावंत होते. रोचक निवेदन नासिर खाँ यांनी केले. निषादचे अध्यक्ष ज्ञानेश पाहुणे, डॉ. प्रफुल्ल मोकदम, कुसुम पांडे, सतीश टकले, दीपक मोझरकर, राजेंद्र भुते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रंगमंच सजावट राजेश अमीन यांची तर ध्वनी संयोजन स्वप्नील उके यांचे होते. (प्रतिनिधी)
मधुर स्वरपुष्पांचा गुलदस्ता ‘इस मोड से जाते है’
By admin | Updated: August 7, 2014 00:59 IST