नागपूर : सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या सादरीकरणाने नागपूर महानगरपालिकेच्या नागपूर महोत्सवाला प्रारंभ होणार म्हणून नागपूरकर रसिकांनी यशवंत स्टेडियममध्ये खच्चून गर्दी केली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन नियोजित वेळेप्रमाणे सायंकाळी ५. ३० वाजता करण्यात येणार होते. पण कार्यक्रमाचे उद्घाटन ६.४५ वाजता करण्यात आले. त्यामुळे आशातार्इंना ऐकण्यासाठी उत्सुक असलेल्या रसिकांनी आशाताई मंचावर येताच टाळ्यांच्या कडकडात त्यांचे स्वागत केले. त्यांच्या सादरीकरणाने नागपूर महोत्सवाला आज प्रारंभ करण्यात आला. त्यांनी गायनाचा प्रारंभ मंगेशकर कुटुंबीयांचे दैवत असलेल्या मंगेशाच्या प्रार्थनेने केला. ‘मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश...’ ही प्रार्थना त्यांनी सादर केली. याप्रसंगी नागपूरकरांशी संवाद साधताना त्यांनी नागपूरच्या रसिकांची प्रशंसा केली. यापूर्वी ६ वर्षापूर्वी येथेच कार्यक्रम सादर केला होता. त्यानंतर पुन्हा नागपूरकरांशी भेटताना आनंद वाटतो, असे त्या म्हणाल्या आणि गदिमांची रचना, सुधीर फडके यांचे संगीत असलेले त्यांचे ‘का रे दुरावा, का रे अबोला...’ आणि त्यानंतर शांता शेळके यांची रचना ‘ही वाट दूर जाते...’ हे गीत सादर केले. रसिकांशी गीतांनंतर संवाद साधत त्यांनी गीत सादर केले. त्यांचा मुलगा हेमंत भोसले यांनी संगीतबद्ध केलेले आणि शांता शेळके यांची रचना असलेले ‘शारद सुंदर चंदेरी राती...’ हे गीत सादर केले.
‘स्वर आशा’ने नागपूर महोत्सवाला प्रारंभ - विजय दर्डा यांच्या हस्ते उद्घाटन
By admin | Updated: January 23, 2015 02:43 IST