नागपूर : महाविद्यालयाचे शुल्क न दिल्याने शहरातील एका नामांकित महाविद्यालयाने विद्यार्थिनीची कागदपत्रे अडविल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यामुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकातील माहितीनुसार, या विद्यार्थिनीला प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिला दाखला पक्का करण्यासाठी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका आणि टीसीची गरज आहे. मात्र या विद्यार्थिनीकडे मागील शुल्क बाकी असल्याचे कारण दर्शवून महाविद्यालयाने कागदपत्रे देण्यास नकार दिला आहे. यामुळे या विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यात अडचण निर्माण झाली आहे. पालकांनी प्राचार्यांकडे विनंती केली. मात्र कुणीही मदत केली नाही, असा आरोप आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मते, या विषयावर विद्यार्थिनी त्यांना भेटलेली नसून उपप्राचार्यांना भेटली आहे. तिला व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश देण्यात आला होता. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे शुल्क तिने भरले, द्वितीय वर्षाचे काही शुल्क जमा केले. अद्यापही अर्धे शुल्क तिच्याकडे प्रलंबित आहे. तृतीय वर्षाचे शुल्कही दिलेले नाही. असे असतानाही तिच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी महाविद्यालयाने दिली. निकाल लागल्यानंतर शुल्क जमा करण्यासोबतच अनेक सवलती तिला दिल्याचे प्राचार्यांचे म्हणणे आहे.