मी लढले आणि जिंकलेहीडॉ. रोहिणी पाटील : अनुभवाने व उपचाराने शेकडो कर्करुग्णांना देत आहेत आधारसुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवसायाने डॉक्टर आणि एका नऊ वर्षांच्या मुलाच्या दृष्टीने डॉ. रोहिणी पाटील ‘सुपरमॉम’. मात्र जेव्हा कॅन्सर असल्याचे निदान झाले तेव्हा ‘मीच का’?, हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न त्यांनाही पडला. मनाचा थरकाप उडवणाऱ्या या आजाराच्या प्रचंड दहशतीचा अनुभव त्यांनी घेतला. या रोगाचा शारीरिकपेक्षा मानसिक त्रासच त्यांना अधिक झाला. मात्र, सकारात्मक विचार ठेवून वेळीच उपचार घेतल्याने त्या आजारातून बाहेर पडल्या. स्वत: कर्करोगातून सावरताना आलेल्या अनुभवातून प्रेरणा घेतली. कॅन्सरच्या रुग्णाला नि:शुल्क सेवा मिळावी म्हणून इमामवाडा येथील स्नेहांचल हॉस्पिटल अँड पॉलिएटिव्ह केअर सेंटर जवळ केले. रात्री-बेरात्री येथील रुग्णांच्या मदतीला त्या धावून जातात. कॅन्सरच्या रुग्णांच्या आयुष्यातील शेवटचा काळ वेदनामय होऊ नये, हा काळ किमान आनंदात जावा, याची त्या पुरेपूर काळजी घेतात. डॉ. रोहिणी पाटील म्हणाल्या, माझा कॅन्सरसोबतचा प्रवास २००२ मध्ये सुरू झाला. मी जरी एक स्त्रीरोगतज्ज्ञ असले तरी कॅन्सर हा वैद्यकीय किंवा बिगर वैद्यकीय असा भेदभाव करीत नाही. प्रत्येक जण या संकटातून वेदना व तणावातून जातो. मात्र या संघर्षमय प्रवासात माझा नऊ वर्षाचा मुलगा माझ्यासाठी ‘सुपरहिरो’ ठरला. २० जुलै २००२ तो दिवस होता. स्तनात गाठ असल्याचे जाणवले. दुसऱ्याच दिवशी ‘बायोप्सी’ करून घेतली. ‘कॅन्सर’चे निदान होताच, मोठा धक्का बसला. यापूर्वी कुटुंबात कुणालाही ही बाधा झालेली नसताना व धोकादायक कारणे नसताना जडलेल्या कॅन्सरच्या चिंतेने ग्रासले. त्यावेळी माझ्या मुलाचे , ‘आई तू हिंमत हरू नको, तू माझी सुपरमॉम आहे’ हे वाक्य माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. माझ्या एकुलत्या एक मुलाची मीच आधार होती. यामुळे खऱ्या अर्थाने स्वत:ला ‘सुपरमॉम’ करण्यास तयार केले. पुढील उपचारासाठी कंबर कसली. आॅगस्ट २००२ मध्ये शस्त्रक्रिया झाली. आहाराचे नियोजन व फिजिओथेरपीला सुरुवात झाली. किमोथेरपीची पहिली मात्रा देण्यात आली. केस गळायला लागले. संपूर्ण टक्कल पडले. हाडातून दुखणे, मळमळ, उलट्या, तोंडामध्ये अल्सर, भावनात्मक उद्रेक या सर्वांशी संघर्ष केला. या संघर्षात प्रत्येकवेळी सकारात्मक विचार ठेवला. मुलाचे ते वाक्य ‘सुपरमॉम’च्या जिद्दीची गाठ बांधून होती. स्वत:ला वैद्यकीय व्यवसायात झोकून दिले. उपचारही सुरू होते. मुलासोबतच मित्र, कुटुंब सदस्य व डॉक्टरांचा मोठा पाठिंबा मिळाला आणि हळूहळू यातून बाहेर पडले. या आजाराने मला जगण्याची कला शिकवली. ही कला इतरांना यावी आणि हा आजार गंभीर होण्यापूर्वीच निदान करण्याची जनजागृती हाती घेतली. महिलांसाठी अनेक तपासणी कार्यक्रम राबविले. याच दरम्यान ‘स्नेहांचल’शी संबंध आला. येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांची शेवटच्या क्षणी हेळसांड होऊ नये म्हणून त्यांची काळजी कुठलेही शुल्क न घेता घेतली जाते. या संस्थेत नि:शुल्क सेवा देणे सुरू केले. त्यांना उपचारासोबतच मानसिक आधार देत आहे. त्यांच्या ओठांवर हसू फुलविण्याचा प्रयत्न करीत आहे.
जिद्द, चिकाटीने कॅन्सरवर मात
By admin | Updated: June 5, 2017 01:55 IST