सुभाष देसाई : पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी देणार प्राधान्यनागपूर : विदर्भात जास्तीतजास्त प्रमाणात उद्योग उभे राहावेत यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. मोठ्या उद्योगांसोबतच येथे लहान उद्योगांची वाढ होण्याची आवश्यकता आहे. हीच बाब लक्षात घेऊन नव्या व विस्तारित ‘एमआयडीसी’मध्ये लहान उद्योजकांसाठी जागा राखीव ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. उद्योग भवनाच्या सभागृहात बुधवारी विदर्भातील उद्योजकांसोबत त्यांनी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.या चर्चेला विदर्भातील उद्योजकांसोबतच जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनुपमा डांगे,‘एमआयडीसी’चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिले. विदर्भात जास्तीतजास्त उद्योग आणण्यासाठी काय करायला हवे, याबाबत देसाई यांनी उद्योजकांकडून जाणून घेतले. याशिवाय जास्तीतजास्त गुंतवणूक येण्यासाठी स्थानिक उद्योजकांचा सहभाग कसा आवश्यक आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला.लहान उद्योजकांना ‘एमआयडीसी’मध्ये भूखंड हवे आहेत. परंतु अनेक ठिकाणी मोठ्या उद्योजकांनी भूखंडावर काहीही उद्योग उभारले नाहीत. असे रिक्त भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भूखंडांचे फेरवाटप करण्यात येईल व यात लहान उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले. बुटीबोरी, कळमेश्वर, वर्धा, हिंगणघाट, देवळी, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे उद्योग उभारण्यासाठी ‘एमआयडीसी’ला पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सरकारचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
विस्तारित ‘एमआयडीसी’मध्ये लहान उद्योजकांसाठी राखीव जागा
By admin | Updated: November 19, 2015 03:42 IST