नागपूर : आर्थिक साक्षरता सप्ताहानिमित्त शनिवारी भारतीय रिझर्व्ह बँक नागपूरतर्फे सायकल रॅली काढण्यात आली. यावर्षी आरबीआयने सप्ताहासाठी ‘आर्थिक अनुशासन व मान्यताप्राप्त संस्थांकडूनच कर्ज घेणे’ हा विषय ठेवला होता. या विषयावर नागरिकांना जास्तीत जास्त जागृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सायकल रॅलीच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात आली.
शनिवारी सकाळी ९ वाजता नागपुरातील रिझर्व्ह बँकेच्या मुख्य कार्यालयात क्षेत्रीय निदेशक संगीता लालवाणी यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीला रवाना केले. याप्रसंगी रिझर्व्ह बँकेचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. आरबीआयच्या अमरावती रोडवरील निवासी कॉलनीत या रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये ४५ कर्मचारी सहभगी झाले होते. यादरम्यान जनजागृतीसाठी पत्रक वितरित करण्यात आले. या सप्ताहात आरबीआय कर्मचाऱ्यांनी विदर्भातील अनेक ठिकाणी वित्तीय साक्षरता शिबिरांचे आयोजन केले होते.