अभिमन्यू निसवाडे : मेडिकलमध्ये एड्स जनजागृती कार्यक्रमनागपूर : बहुसंख्य खासगी इस्पितळांमध्ये एचआयव्हीबाधित रुग्णांवर उपचार होत नाही. रुग्ण आल्यास त्याला शासकीय रुग्णालयांकडे पाठविले जाते. यावरून एड्सच्या जनजागृतीपेक्षा त्याच्या दहशतीचाच प्रचार अधिक होत असल्याचे दिसून येते. ही दहशत दूर होणे आवश्यक आहे, असे मत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी व्यक्त केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागात आज सोमवारी जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे बोलत होते. मंचावर अस्थिरोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. सजल मित्रा, रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. किशोर टावरी, मायक्रोबॉयलॉजीच्या डॉ. स्वरुपम आदी उपस्थित होते.डॉ. निसवाडे म्हणाले, आजही अनेक एचआयव्हीबाधितांना यावर औषधोपचार आहेत, तो कुठे मिळते, कुठे नोंदणी करावी याची माहिती नाही. मेडिकलधील एआरटी केंद्रावर २२ हजार रुग्णांचा भार आहे. डॉ. टावरी म्हणाले, एड्सवरील जनजागृती आणखी व्यापक प्रमाणात होणे आवश्यक आहे. आजही एड्सला घेऊन अनेक जण शंका निर्माण करतात. डॉ. मित्रा म्हणाले, शासकीय इस्पितळांमध्ये एचआयव्हीबाधित रुग्णांची शस्त्रक्रिया फार कमी होते. अशा रुग्णांना थेट शासकीय रुग्णालयांकडे पाठविले जाते. हे थांबणे गरजेचे आहे. नवनवीन औषधांमुळे व प्रभावी उपचारामुळे एचआयव्हीबाधितांचे आयुर्मान वाढले आहे, असेही ते म्हणाले.मेडिकलमध्ये हा कार्यक्रम मायक्रोबॉयलॉजी विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. दरम्यान मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी एड्स जनजागृती रॅली काढली. पथनाट्यातून रुग्णांना एचआयव्हीची माहिती देण्यात आली. कार्यक्रम स्थळी एड्स म्हणजे काय, तो कसा पसरतो व औषधोपचार याची माहिती देणारे चित्रप्रदर्शन कौतुकाचा विषय ठरला. यावेळी मेडिकलचे विभाग प्रमुख, वरिष्ठ डॉक्टर व परिचारिका उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
जनजागृतीपेक्षा एड्सच्या दहशतीचाच प्रचार
By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST