शरद मिरे
भिवापूर : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग महत्त्वाचा ठरतो. मात्र याच महत्त्वाकांक्षी विभागात सध्या पदोन्नती प्रक्रियेतील घोळ कार्यरत सेवाज्येष्ठ सहायक अभियंत्यांच्या (श्रेणी १) अनुभवी कर्तृत्वावर घाला घालणारा आहे. सेवाज्येष्ठांना डावलून सहायक कार्यकारी अभियंता संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यावर शासन मेहेरबान आहे. त्यामुळे जलसंपदा विभागातील पदोन्नतीच्या प्रक्रियेत पाणी मुरतेय कुठे, असा प्रश्न पडला आहे.
नियमानुसार एका पदावर दोन सरळसेवेने नियुक्त्या होत नाहीत. मात्र हा पराक्रम जलसंपदा विभागात सुरू आहे. ‘बॅकलॉग’च्या नावाखाली २०१३ मध्ये तब्बल ९६ सहायक कार्यकारी अभियंता संवर्गातील पदे एकाच स्पर्धा परीक्षेव्दारे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे याविरुद्ध अभियंता संघटनांनी न्यायालयात दाद मागितली होती. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २५ जुलै २०१२ रोजीच्या शासननिर्णयाव्दारे पदभरतीवर निर्बंध नसल्याने सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही एकाच वेळेस सुरू केल्यास शासनास अपेक्षित असलेल्या गुणवत्तेचे उमेदवार निवडले जाणार नाही. ही बाब अधोरेखित केली असताना सदरची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे २०१३ मध्ये स्पर्धा परीक्षेव्दारे शिफारस झालेल्या एकूण ९६ अभियंत्यांपैकी तब्बल ७७ अभियंते २०१२ मध्ये ठरवून दिलेल्या किमान गुणांच्या निकषात बसत नसतानासुध्दा त्यांची भरती झाली. त्यामुळे अपेक्षित गुणवत्ता नसतानासुद्धा अतिमहत्त्वाच्या सहायक कार्यकारी अभियंतापदावर आरूढ झाले असून त्यांना आता पदोन्नती मिळत आहे. त्यातही नियुक्त झालेल्या अभियंत्यांचे केवळ ४ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित ८ महिन्यांचे प्रशिक्षण शिल्लक असताना परिविक्षाधीन कालावधी समाप्त करत त्यांना स्थायित्व लाभ प्रमाणपत्र देण्याचा प्रतापही करण्यात आला.
मॅटच्या आदेशाला तिलांजली
यासंदर्भात सहायक अभियंता श्रेणी १ च्या अभियंता संघटनेनी मॅटकडे दाद मागितली. त्यावर सुनावणी होऊन सहायक कार्यकारी अभियंत्यांच्या पदोन्नती प्रक्रियेला स्थगिती देत, मॅटने सेवा नियमानुसार पदोन्नतीची कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले. शिवाय पदोन्नती नियमावली १९८३ चे पालन करावे असेही सूचित केले. मात्र मॅटच्या आदेशाला तिलांजली देत, जलसंपदा विभागातील पदोन्नती प्रक्रियेतील घोळ कायम आहे. त्यामुळे कौशल्य व अनुभव प्राप्त सहायक श्रेणी १ चे अभियंते पदोन्नतीपासून वंचित आहेत.
काय म्हणते पदोन्नती?
कार्यरत सहायक कार्यकारी अभियंत्यांच्या पदोन्नतीचा कालावधी ४ वर्षे तर सहायक अभियंता श्रेणी १ च्या पदोन्नतीचा कालावधी ७ वर्षाचा आहे. त्यानुसार २०१० ला नियुक्त झालेल्या ९६ सहायक कार्यकारी अभियंत्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र २००९ ते २०११ या तीन बॅचेसमध्ये नियुक्त झालेल्या व पदोन्नतीसाठी आवश्यक ७ वर्षाचा कालावधी पूर्ण केलेल्या राज्यभरातील १५० च्यावर सहायक अभियंत्यांना अद्यापही पदोन्नती मिळालेली नाही.