लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील बेकाबू झालेल्या कोरोनावर अंकुश बसविण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासन शनिवारपासून एक विशेष मोहीम सुरू करणार आहे. त्यानुसार, रस्त्या-रस्त्यावर फिरणाऱ्यांची जागच्या जागी अँटिजन टेस्ट तपासणी केली जाणार असून, तो पॉजिटिव्ह दिसल्यास त्याला तेथूनच १४ दिवसांसाठी क्वरंटाइन केले जाणार आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या विशेष मोहिमेची माहिती ‘लोकमत’ला देताना कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
लॉकडाऊन आहे, विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. मात्र, पोलिसांनी हात (दंडा) आखडता घेतल्यामुळे अनेक रिकामटेकडे रस्त्यावर गर्दी करीत आहेत. त्यात सुपरस्प्रेडर्सची संख्या मोठी आहे. वारंवार विनंती, आवाहन करूनही नागरिक ऐकायला तयार नसल्याने शहरात कोरोनाने भयावह स्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे प्रशासनाने सुपरस्प्रेडर्सना आवरण्यासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी आणि पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज उपाययोजनांबाबत मंथन केले. त्यातून रस्त्या-रस्त्यावर फिरणाऱ्यांची अँटिजन बॉडी टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारपासून ही विशेष मोहीम महापालिका आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे राबविणार आहे. वेस्ट हायकोर्ट रोड, सेंट्रल एव्हेन्यू, कामठी रोडसह अन्य काही ठिकाणी महापालिका तसेच पोलीस कर्मचारी उभे राहतील. ते रस्त्यावर फिरणाऱ्यांना थांबवतील. त्यांची तेथेच अँटिजन बॉडी टेस्ट केली जाईल. तो पॉजिटिव्ह आढळल्यास त्याला तेथूनच १४ दिवसांसाठी क्वरंटाइन केले जाईल. शहरातील सर्वच भागात पुढे ही मोहीम राबविली जाणार आहे.
----
४२६१ जणांवर कारवाई
ॲक्शन मोडवर आलेल्या पोलिसांनी शहरातील विविध भागँत आज एकूण ४२६१ जणांवर कारवाई केली. त्यात २२४४ वाहने ताब्यात घेण्यात आली. मास्क न वापरणाऱ्या ७३५, तर सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या १२८२ जणांवरही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी पोलिसांनी कारवाईचा धडाका लावल्याचे लक्षात आल्याने अनेक भागांतील रस्त्यांवर तुलनेत वर्दळ कमी होती.
---
डीसीपी साहू शिरल्या मॉलमध्ये
मॉलमध्ये असलेल्या रेस्टॉरंटमध्ये नियमांचे पालन केले जाते की नाही, ते बघण्यासाठी शुक्रवारी दुपारी पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी अचानक सीताबर्डीतील एका मॉलमध्ये धडक दिली. आतमध्ये असलेल्या दोन रेस्टॉरंटची त्यांनी पाहणी केली. तेथे कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे, ते तपासले. त्यानंतर आवश्यक त्या परवानीचे कागदपत्रेही तपासली.
----