जागतिक परिचारिका दिन विशेष
निशांत वानखेडे
नागपूर : इतर आजारांचे रुग्ण उपचार घेताना त्यांच्या नातेवाइकांची ये-जा व भेटणे सुरू असते; मात्र काेराेना रुग्णांच्याबाबत तसे नाही. त्यांना अलिप्त राहावे लागते व नातेवाइकांना प्रवेश दिला जाऊ शकत नाही. डाॅक्टर त्यांच्यावर उपचार करीत असतात; पण त्यांना शारीरिक, मानसिक व भावनिक आधार देण्याचे काम खऱ्या अर्थाने परिचारिकांना करावे लागते. या काळात हेच काम फेबा शाल्विन यांच्यासारख्या परिचारिका करीत आहेत.
फेबा शाल्विन या ऑरेंज सिटी रुग्णालयातील काेराेना वार्डाच्या मुख्य परिचारिका आहेत. गेली १० वर्षे त्या रुग्णसेवा देत आहेत. मधल्या काळात लग्नानंतर त्या भाेपाळला सेवा देत हाेत्या. यावर्षी काेराेनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून त्यांनी नागपूर गाठले, पुन्हा सेवा सुरू केली व काेराेना वार्डातच जाॅईनिंग करून घेतली. रुग्णांच्या नातेवाइकांना येण्यास मनाई असल्याने अनेकदा गैरसमज हाेत असतात; मात्र अशाही परिस्थितीत आराेग्यसेवक प्रामाणिक सेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित औषधाेपचार व माॅनिटरिंग करण्यासह वेळेवर रुग्णांना जेवण भरवून देण्यापर्यंतची सेवासुश्रुषा करावी लागते. काेराेनामुळे शासकीय रुग्णालयांप्रमाणे खासगी रुग्णालयांवरही भार आला आहे आणि अशा परिस्थितीत परिचारिकांनी कर्तव्य बजावल्याचा अभिमान फेबा यांनी व्यक्त केला.
पीपीई किटमध्ये काम करणे आव्हानात्मक
विशेषत: पीपीई किटमध्ये काम करणे आव्हानात्मक असते; मात्र डाॅक्टरांसह परिचारिकांनी हे आव्हान पेलविले आहे. अनेक परिचारिकांवर काेराेना संक्रमणाचे संकट ओढवले असेल; पण त्या हिमतीने किल्ला लढवत आहेत. अशी परिस्थितीत कधीही न अनुभवल्याचे फेबा सांगतात. आयसीयुमध्ये काम करताना अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांचा अनुभव आहे; पण यावेळी अनेक हृदयद्रावक प्रसंग पाहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे लवकरात लवकर ही महामारी नियंत्रणात यावी, अशी ईश्वराला प्रार्थना असल्याची भावना फेबा यांनी व्यक्त केली.