जीवन रामावत नागपूर त्याला पिंजऱ्यात कैद करण्यासाठी रोज कसरत केली जात आहे. उपाशी ठेवून, बकरीचे आमिष दाखविले जात आहे. शिवाय इतरही वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. परंतु त्याने ते सर्व प्रयत्न फेल ठरविले आहेत. वन अधिकारी त्याला लवकरात लवकर पुण्याला पाठविण्यासाठी आटापिटा करीत आहे. मात्र तोही तेवढ्याच ताकदीने लढा देत आहे. गत आठ दिवसांपासून सुरू असलेला त्याचा हा संघर्ष पाहता, त्याला विदर्भाचा लळाच लागला असावा ! असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.पेंच व्याघ्र प्रकल्पातील हा वाघ सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. वन विभागाने त्याला पुणेशेजारच्या कात्रज येथील राजीव गांधी ज्युलॉजिकल पार्कमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गत २२ आॅगस्ट रोजी पुणे येथील पथक एका डॉक्टरसह नागपुरात दाखल झाले आहे. तेव्हापासून ते पेंचमध्ये ठाण मांडून बसले आहे. परंतु अद्याप वाघ पिंजऱ्यात पोहोचलेला नाही. त्यामुळे शेवटी या पथकातील डॉक्टरसह काही लोकांनी परतीचा मार्ग धरल्याची माहिती पुढे आली आहे. विदर्भातील वाघ हा उपराजधानीची ओळख बनला आहे. त्यामुळे पेंचमधील वाघ हा विदर्भातच राहावा, अशी सर्वस्तरातून मागणी पुढे येत आहे. शिवाय वन विभागाच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला जात आहे. यात आता स्वत: वाघसुद्धा विदर्भ सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. परंतु वन विभागातील काही वरिष्ठ अधिकारी या सर्व विरोधाला न जुमानता, विदर्भातील वाघ पुण्याला पाठविण्याचा हट्ट धरून बसले आहेत.
पेंचचा वाघ पुण्याला जाईना !
By admin | Updated: August 30, 2014 02:42 IST