नागपूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या संकेतस्थळावर विस्तारातील मंत्र्यांची यादी टाकण्यात आलेली नव्हती. केवळ १० मंत्र्याचीच यादी उपलब्ध होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये शुक्रवारी वृत्त प्रकाशित होताच यादी उपलब्ध करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारा विभाग अशी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे. या विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांसोबतच शासनाची यशोगाथा मांडली जाते. माहिती सहजसुलभ उपलब्ध होण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संकेतस्थळ आहे. त्या संकेतस्थळावर बरीचशी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. मात्र गुरुवारपर्यंत या संकेतस्थळावर मंत्र्यांची अपूर्ण माहिती होती. मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्री आणि त्यांची खाती यांची अद्ययावत माहिती टाकण्यास महासंचालनालय विसरले होते.याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘विस्तारातील मंत्र्यांची ‘माहिती’ विसरले!’ शीर्षकांतर्गत शुक्रवारी वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्याची दखल घेत अखेर शुक्रवारी दुपारपर्यंतच यादी ‘अपडेट’ करून ती यादी उपलब्ध करण्यात आली.आता जोडलेल्या नव्या यादीत मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्री गिरीश बापट, गिरीश महाजन, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, बबन लोणीकर, डॉ. दीपक सावंत, राजकुमार बडोले या कॅबिनेट मंत्र्यांसह राम शिंदे, विजय देशमुख, संजय राठोड, दादाजी भुसे, विजय शिवतारे, दीपक केसरकर, राजे अंबरिशराव आत्राम, रवींद्र वायकर, डॉ. रणजित पाटील, प्रवीण पोटे - पाटील यांना स्थान देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांकडे खाती कोणती?माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हा विभाग (खाते) खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. परंतु त्यांच्याकडे असलेल्या खात्याची माहिती अद्याप माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अपडेट केलेली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, नगर विकास, गृह, विधी व न्याय विभाग, बंदरे, पर्यटन, माहिती व जनसंपर्क, माजी सैनिकांचे कल्याण, राजशिष्टाचार, रोजगार व स्वयंरोजगार व इतर मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग हे आहे. असे असताना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणतीच खाती दर्शविलेली नाही. केवळ ‘इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्याचे भाग’ एवढाच उल्लेख केला आहे.
संकेतस्थळावर मंत्र्यांची यादी ‘अपडेट’
By admin | Updated: December 20, 2014 02:39 IST