वसंतोत्सवाची सांगता : देशपांडे, बांदोडकर जोडगोळीने जिंकले रसिकांचे मननागपूर : उपराजधानीच्या कडाक्याच्या थंडीत स्वरांची ऊब. त्यातही जर दोन प्रसिद्ध गायकांची जुगलबंदी असेल आणि त्याला ‘फ्यूजन’ची साथ मिळाली तर क्या कहने ! राहुल देशपांडे अन् स्वप्निल बांदोडकर यांच्या स्वरांनी डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहातील प्रेक्षक अक्षरश: स्वरसुमनांच्या सुगंधाने मोहित झाले. पहिल्यांदाच मुंबई-पुण्याबाहेर झालेल्या व ‘स्वरवेध’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या वसंतोत्सवाची ‘स्वरा’ या बहारदार कार्यक्रमाने रविवारी सायंकाळी सांगता झाली. या संगीत उत्सवामुळे रसिकांना सुखद स्वरानुभवाने नटलेला स्वर‘वसंत’च अनुभवायला मिळाला.‘स्वरा’ची सुरुवात झाली ती ‘पुरिया धनश्री’ रागातील ‘पिया समझाऊ ...समझत नाही..’ या गीतापासून. पारंपरिक रागाने सुरुवात झालेल्या गाण्यात हळूवारपणे ‘फ्यूजन’ सामावले गेले अन् रसिक या संगमात हरवून गेले.‘लागी लगन बैरी संग’ या ‘यमन’ रागातील गाण्यानंतर सादर करण्यात आलेल्या ‘राधाधर मधुमिलिंद जय जय रमा रमण’ या भक्तिरचनेच्या तालाने ‘सौभद्र’ची अनुभूती घेण्याची संधी राहुल देशपांडे यांच्या स्वरांनी दिली. त्यानंतर स्वप्निल बांदोडकरने सादर केलेल्या ‘राधा ही बावरी’ या गाण्याला सभागृहाने अक्षरश: डोक्यावर घेतले. या गाण्यादरम्यानच बासरी अन् तबला यांच्या जुगलबंदीला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. ‘रवि मी हा चंद्र कसा’, ‘घेई छंद मकरंद’, ’अलबेला सजन आयो रे’ या गाण्यात दोघाही गायकांनी अक्षरश: जीव ओतला. कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात ‘प्रथम तुला वंदितो’, ‘विठ्ठल नामाचा रे टाहो’ अ़न् ‘कानडा राजा पंढरीचा’ या भक्तिगीतांमध्ये सभागृह अक्षरश: तल्लीन झाले होते.या संपूर्ण कार्यक्रमात सचिन बक्षी, अॅड.भानुदास कुळकर्णी, श्रीकांत पिसे, शिरीष भालेराव, महेंद्र ढोले, अरविंद उपाध्ये आणि नंदू गोहणे यांची सुरेल साथसंगत लाभली. (प्रतिनिधी)
दरवळला जुगलबंदीचा ‘स्वरा’गंध
By admin | Updated: January 12, 2015 01:04 IST